संविधान धोक्यात आहे, पुन्हा देश तोडू देणार नाही – यशवंत सिन्हा

966

माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी मुंबईहून गांधी शांती यात्रा काढली आहे. ही यात्रा रविवारी सैफई येथे पोहोचली आहे. यावेळी सिन्हा यांनी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात भाग घेतला. यावेळी ते म्हणाले की, ‘देश पुन्हा तोडू देणार नाही.’ यशवंत सिन्हा आणि समाजवादी पार्टीचे (सपा) प्रमुख अखिलेश यादव यांनी 158 फूट उंच तिरंगा ध्वज फडकावला. यशवंत सिन्हा म्हणाले, ‘आम्ही महात्मा गांधीजींचा सत्य, शांती आणि अहिंसेचा संदेश देत निघालो आहोत. ही यात्रा पुढे घेऊन जाण्याची गरज आहे. आज संविधान आणि लोकशाही धोक्यात आली आहे.’

सिन्हा पुढे म्हणाले की, ‘ 26 जानेवारी 1950 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी देशाला संविधान दिले होते. ते संविधान आज धोक्यात आले आहे. त्यासाठी ही गांधी शांती यात्रा काढण्यात आली आहे. देशभरात निदर्शने होत आहेत, धर्माच्या नावाखाली देशाचे विभाजन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु आम्ही पुन्हा देश तोडू देणार नाही,’ असे सांगत त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.

आपली प्रतिक्रिया द्या