Yavatmal News – बहिणीच्या छळाचा रक्तरंजित सूड; अधिक महिन्यात घरात घुसून जावयासह तिघांवर जीवघेणा हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अधिक महिन्यातच एका कुटुंबावर रक्तरंजित हल्ल्याची वेळ आल्याने वणी शहर हादरले आहे. विवाहितेवर होत असलेल्या कथित शारीरिक आणि मानसिक छळाचा सूड घेण्यासाठी एका भावाने आपल्या साथीदारांसह थेट जावयाच्या घरात घुसून जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना वणी शहरातील शास्त्रीनगर परिसरात मध्यरात्री घडली. या भीषण हल्ल्यात जावई, त्याची काकू आणि काका गंभीर जखमी झाले असून अक्षय बोढे याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शास्त्रीनगर येथील रहिवासी अक्षय बोढे याचा विवाह चंद्रपूर येथील एका तरुणीसोबत झाला होता. मात्र लग्नानंतर पतीकडून छळ होत असल्याची तक्रार संबंधित महिलेने वारंवार माहेरी सांगितली होती. बहिणीवर होत असलेल्या कथित अत्याचारामुळे संतप्त झालेला तिचा भाऊ गुरुवारी मध्यरात्री काही साथीदारांना घेऊन थेट अक्षयच्या घरी पोहोचला. सुरुवातीला दोन्ही बाजूंमध्ये जोरदार वाद झाला. मात्र काही वेळातच हा वाद विकोपाला गेला आणि आरोपींनी सोबत आणलेल्या धारधार शस्त्रांनी अक्षयवर सपासप वार करण्यास सुरुवात केली. अक्षयवर हल्ला होत असल्याचे पाहून त्याची काकू मध्यस्थी करण्यासाठी धावली. मात्र आरोपींनी तिच्यावरही वार केले.

आरडाओरडा ऐकून अक्षयचे काका विजय बोढे हे पुतण्याच्या मदतीसाठी पुढे आले असता त्यांनाही गंभीर जखमी करण्यात आले. या हल्ल्यात अक्षय रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. मध्यरात्री घडलेल्या या थरारक घटनेमुळे शास्त्रीनगर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर काका काकूंची प्रकृती स्थिर आहे. अक्षय प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले.

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात फरार आरोपींचा शोध सुरू केला असून याप्रकरणी खुनाचा प्रयत्न केल्याचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.