यवतमाळमध्ये पुष्पा स्टाईल गुटखा तस्करीचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला

>> प्रसाद नायगावकर

दाक्षिणात्य नायक अल्लू अर्जुन चा काही वर्षांपूर्वी पुष्पा नावाचा चित्रपट आला होता. प्रेक्षकांनी या चित्रपटाला अक्षरश: डोक्यावर घेतले . या चित्रपटात नायक हा वेगवेगळ्या क्लुप्त्या काढून रक्तचंदन लाकडाची तस्करी करतो. त्यावेळी तो नायक एक वेगळी शक्कल लढवीत दुधाच्या टँकर मधून रक्तचंदनाची तस्करी करताना दाखविला आहे. याच चित्रपटाच्या कथानकाला शोभेल अशी घटना यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे घडली आहे. दुधाच्या टँकर मधून गुटखा तस्करीचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे तो प्रयत्न फसला .

अशीच पुष्पा स्टाईल होणारी तंबाखूची तस्करी वणी येथील गाडगे बाबा चौकात उघडकीस आली. एका दूध पोहोचविणारी गाडी चौकात संशयास्पदरित्या उभी होती . या गादीवर संशय आल्याने गाडीची पोलिसांनी तपासणी केली असता यात प्रतिबंधीत मजा तंबाखूचे बॉक्स असल्याचे आढळले. यामुळे पोलीसही अचंबित झाले. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. प्राथमिक माहितीत हा माल नागपूर येथून आल्याचे समजते . मात्र ज्यांनी माल बोलावला होता तो कोण याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

ठाणेदार अनिल बेहराणी यांना खबरीद्वारा याच गाडीतून वणीत सकाळी सुगंधित तंबाखूची तस्करी होत आहे अशी माहिती प्राप्त झाली. यावरून ठाणेदार यांनी डीबी पथकाला रवाना केले. दरम्यान गाडगेबाबा चौकात निकिता एजन्सी येथे एक मालवाहक उभी असल्याचे दिसून आले. या गाडीच्या मागे आणि पुढे दूधगंगा असे लिहिले होते. त्यावरून यात दूध वाहतूक होत असल्याचे सकृतदर्शनी दिसून येत होते. पोलिसांनी गाडीच्या मागील डाल्याची पाहणी केली असता त्यामध्ये ब्रेड व दूध वाहून नेण्याचे 85 ट्रे होते. मात्र गाडीत सुगंधी तंबाखूचा उग्र वास पसरला होता. त्यामुळे त्यांनी गाडीचा चालक व क्लिनर याला विचारणा केली असता त्यांनी गाडीत तंबाखू असल्याची माहिती दिली. यात महाराष्ट्रात बंदी असलेल्या सुगंधित तंबाखूच्या 13 बोऱ्या आढळल्या . पोलिसांनी सुगंधी तंबाखूसह एकूण 14 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे

पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे . ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड,अतिरिक्त पोलीस अधीक्षक पियुष जगताप ,उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे, ठाणेदार अनिल बेहराणी,यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली .