
प्रसाद नायगावकर
यवतमाळ जिल्ह्यातील दुर्गम परिसरातील मुकूटबन ता. झरी जामनी येथील सैनिक मुश्ताक शफीउद्दीन सैय्यद हे 22 वर्षे सीमा सुरक्षा दलात सेवा बजावल्यानंतर निवृत्त होऊन 7 फेब्रुवारी रोजी गावी परतले. हा अनोखा क्षण ग्रामस्थांनी अविस्मरणीय केला. त्यांच्यावर पुष्पवृष्टी करत गावातून मिरवणूक काढली. अवघे ग्रामस्थ जवानाच्या स्वागतासाठी एकवटले होते.
मुश्ताक शफीउद्दीन सैय्यद हे सन 2000मध्ये सीमा सुरक्षा दलात भरती झाले होते. जम्मू काश्मीर,पंजाब, पश्चिम बंगाल, मेघालय, नागालँड अशा सीमावर्ती भागात तैनात राहून त्यांनी देशसेवा केली. या काळात सीमावर्ती भागात उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना गौरवण्यात पण आले. शेवटी 22 वर्ष देशसेवा करून निवृत्त होऊन ते घरी परतत असल्याची वार्ता गावात कळताच एकच उत्साहाचे वातावरण पसरले. कोरोनाच्या सावटातही नियम पाळून त्यांचे जंगी स्वागत करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मुश्ताक शफीउद्दीन सैय्यद हे आज गावात दाखल होताच पेट्रल पंपजवळ प्रवीण कासवार यांनी स्वागत केले. ‘भारत माता की जय’ च्या घोषणांनी कृषी उत्पन्न बाजार समिती जवळ त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. मुकूटबन पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अनिल सकवान, जय बजरंग शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गणेश उदकवार, भालचंद्र बरशेट्टीवार यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर वाहनातून जल्लोषात बसस्थानक, मातामंदिर मार्गे घरापर्यंत मिरवणूक काढून घरी पोहचवण्यात आले. गावातील महिलांनी मिरवणुकीच्या मार्गाने रांगोळी काढून जवानांचे स्वागत केले. ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा त्यांचे स्वागत करण्यात आले.
या सोहळ्यासाठी रफिक शेख व मित्रमंडळी, रामनवमी उत्सव समिती, जय बजरंग गणेश मंडळ, ईस्लाहूल मुस्लमीन कमिटी न्यू इलेव्हन क्रिकेट क्लब, डॉल्फिन क्रिकेट क्लब आजी-माजी सैनिक यांनी पुढाकार घेतला.

























































