पुलावरून मालवाहू ॲपे पलटी झाल्याने सहा जण ठार, 9 जण जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रसाद नायगावकर, यवतमाळ

यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील बेलगव्हाण घाटातील जंगलामधील लहान पुलावरून मालवाहू ॲपे पलटी झाल्याने चार जण जागीच ठार झाले. तर उपचारादरम्यान दोघा जणांचा मृत्यू झाल्याची घटना 16 जानेवारी 2024 रोजीच्या सकाळी 11.30 वाजताच्या दरम्यान घडली आहे. अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोन चिमुकल्यांना नांदेड येथे उपचाराकरिता भरती करण्यासाठी रवाना केले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे.घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचा व वाहतूक पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला होता.

उषा विष्णू राठोड (वय 60 वर्षे रा.जवाहर नगर, धुंदी),ज्योती नागा चव्हाण (वय 60 रा.जवाहर नगर, धुंदी), वसराम देवसिंग चव्हाण (वय 65 वर्षे रा. सिंगरवाडी, धानोरा), पार्वती रमेश जाधव (वय 55 वर्षे रा.वसंतपूर) या चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये भरती केल्यानंतर उपचारादरम्यान लिला वसराम चव्हाण (वय 60 वर्षे सिंगरवाडी, धानोरा), सावित्री गणेश राठोड (वय 45 वर्षे रा.जवाहर नगर, धुंदी) या दोघा जणांचा मृत्यू झाला आहे.

अपघातामध्ये एकूण सहा जणांचा मृत्यू झाला असून नांदेड येथे प्रथमेश अर्जुन राठोड (वय 3 वर्षे रा.सेवा नगर पांढुर्णा) व राज राहुल चव्हाण (वय 5 वर्षे टोकी तांडा शिवानगर) हे दोन चिमुकले गंभीर जखमी झाल्याने उपचाराकरिता रेफर केले आहे. त्याशिवाय नऊ जण जखमी झाले आहेत. प्राप्त माहितीनुसार दरवर्षीप्रमाणे उमरीच्या देवीला 16 जानेवारी 2023 रोजीच्या सकाळी 11 वाजताच्या दरम्यान नवसासाठी बकरे घेऊन मालवाहू क्रमांक एमएच 29, 3272 मध्ये जवळपास 12 ते 13 जण जात होते. दरवर्षी धुंदी, सिंगरवाडी व जवाहर नगर येथील नातेवाईक उमरीच्या देवीला नवस फेडण्यासाठी जात असल्याची माहिती मिळाली आहे. मालवाहू ॲपे ऑटोमध्ये बेलगाव्हाणच्या जंगलातून जीर्ण झालेल्या पुलावरून ऑटो जात होता.

क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरल्याने झाला अपघात

पुसद तालुक्यामध्ये तीन चाकी वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन जात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.तरी देखील पोलीस प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची कारवाई केल्या जात नाही.वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या ऑटो चालकावर कारवाई करण्याची मागणी जागृत नागरिकाकडून जोर धरत आहे. यात विशेष भाग म्हणजे मालवाहू ऑटो ॲपेमध्ये परवानगी नसताना प्रवासी घेऊन गेल्याने अपघात झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

कायद्याच्या धाकाने चालकाकडून आत्महत्येचा प्रयत्न

ऑटो ॲपेमध्ये जवळपास 15 जण प्रवास करीत होते.अशावेळी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्या पुलावरून ऑटो पलटी झाल्याने चार जणांचा जागीच मृत्यू झाला होते.त्यात ऑटो चालक देखील जखमी झाला होता.अशावेळी त्याचा मनावरील ताबा सुटल्याने तो बाजूलाच असलेल्या झाडाला फाशी घेण्याचा प्रयत्न करत होता.उपस्थितांनी त्याला धरून एका वाहनांमध्ये उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते.

जखमीला भेटण्यासाठी आमदार व गटविकास अधिकारी दाखल

दर्शन संतोष पवार (वय 57 वर्षे रा.शिवा नगर), सोहमनाथ गणेश राठोड (रा.जवाहर नगर, धुंदी), निर्मला गणेश राठोड (रा.जवाहर नगर, धुंदी), पूजा सागर चव्हाण, गणेश लच्छीराम राठोड (वय 62 वर्षे, रा.जवाहर नगर, धुंदी), आशा फुलसिंग चव्हाण (वय 42 वर्षे रा.जवाहर नगर, धुंदी तांडा) व अनिता सोहमनाथ राठोड (रा.जवाहर नगर,धुंदी) अशी जखमींची नावे असून त्यांवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात झाल्याची माहिती कळताच अपघात ग्रस्तांना भेटण्यासाठी पुसद विधानसभा मतदारसंघाचे आमदार इंद्रनील नाईक व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय राठोड यांनी भेट देऊन नातेवाईकांची सांत्वन केले होते.