
हिंदी टीव्ही इंडस्ट्रितील सुप्रसिद्ध मालिका ये रिश्ता क्या कहलाता है आणि साथ निभाना साथिया फेम अभिनेता अनुज सचदेवाने सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये एका व्यक्तीने काही कारणांवरून अनुज आणि त्यांच्या पाळीव कुत्र्याला मारहाण केल्याचे दिसत आहे. या घटनेमुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचेही त्याने सांगितले आहे. यावर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली असून चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया दिलीए.
नेमकं काय घडलं?
अभिनेता अनुज सचदेवने रविवारी 14 डिसेंबर रोजी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याच्या बिल्डींगमध्ये राहणाऱ्या एका व्यक्ती अनुजला लाकडी काठीने मारहाण करताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना अनुजने कॅप्शनही दिले आहे. यामध्ये व्हिडीओमध्ये दिसणारा व्यक्ती माझ्या प्रॉपर्टीला आणि मला त्रास देण्यापूर्वी मी हा व्हिडीओ तुमच्या सोबत शेअर करतोय. त्या व्यक्तीची कार त्याने चुकीच्या ठिकाणी पार्किंग केली होती. यासंदर्भात सोसायटी ग्रुपवर मॅसेज टाकल्यामुळे त्या व्यक्तीने मला आणि माझ्या कुत्र्याला मारण्याचा प्रयत्न केला आहे, असे अनुजने म्हटले आहे.
View this post on Instagram
सदर घटना ही हार्मनी मॉल रेसिडेन्सी, गोरेगावमध्ये घडली आहे. तो व्यक्ती अनुजच्या अंगावर धावून गेला. आणि त्य़ाने एका लाकडाच्या काठीने अनुजला मारहाण केली. यामध्ये अनुजला गंभीर दुखापत झाली असून त्याच्या डोक्यातून रक्त येत असल्याचे अनुजने म्हटले आहे.
अनुजच्या या व्हिडीओवर संतप्त नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या. तुम्ही स्वत:ची काळजी घ्या… असे त्यांनी म्हटले आहे. काहींनी मुंबई पोलिसांना टॅग करत कारवाईची मागणी केली आहे. तसेच अनेक कलाकारांनीही अनुजची विचारपूस केली आहे.




























































