Yemen stampede रमजान निमित्त आयोजित धर्मादाय कार्यक्रमात चेंगराचेंगरी, 85 जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

येमेनची (Yemen) राजधानी सनामध्ये रमजान (Ramadan) निमित्त आयोजित एका धर्मादाय कार्यक्रमामध्ये चेंगराचेंगरी झाली आहे. यात 85 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची संख्या जास्त असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

रमजान महिन्याच्या अखेरच्या दिवशी येमेनची राजधानी सना येथे धर्मादाय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. येथे गरिबांना आर्थिक मदत म्हणून पैशांचे वाटप केले जात होते. या कार्यक्रमासाठी मोठी गर्दी उसळली होती. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 85 जणांचा मृत्यू झाला असून 322 हून अधिक लोकं गंभीर जखमी झाले आहेत. यातील 13 लोकांची प्रकृती गंभीर आहे.

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, बुधवारी रात्री रमजान निमित्त गरिबांना आर्थिक मदत देण्यासाठी येथील व्यापाऱ्यांनी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. स्थानिक प्रशासनाला पूर्वकल्पना न देता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याने मोठी गर्दी उसळली होती. शहरातील गरीब लोकांनी या कार्यक्रमाला गर्दी केल्याने मोठा गोंधळ उडाला.

अनियंत्रीत झालेल्या गर्दीला पांगवण्यासाठी हुती सैन्याच्या जवानांनी हवेत गोळीबार केला. गोळीबारामुळे विजेच्या तारांचा स्फोट झाला आणि यामुळे गोंधळ आणखीच वाढला. गोळीबार आणि स्फोटाचा आवाज ऐकून लोकं सैरावैरा धावू लागली. यादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक लोकांचा मृत्यू झाला. याचे व्हिडीओही समाज माध्यमावर व्हायरल झाले आहेत.

दरम्यान, ही दुर्घटना झाली तेव्हा घटनास्थळी किती गर्दी जमली होती याची माहिती मिळालेली नाही. परंतु जिथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ती एक अरुंद गल्ली होती. त्यामुळे आर्थिक मदत मिळवण्यासाठी जवळपास 2 किलोमीटर पर्यंत रांग लागली होती. शहरामध्ये अनेक ठिकाणी अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे एका ठिकाणी आर्थिक मदत मिळवून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी लोकांची कसरत सुरू होती. या गोंधळादरम्यानच चेंगराचेंगरी झाली. प्रकरणी प्रशासनाने आयोजकांना जबाबदार धरले असून दोघांना ताब्यात घेतले आहे.