येस बँकेच्या ग्राहकांना मोठा दिलासा,7 गुंतवणूकदार करणार 11 हजार 750 कोटींची गुंतवणूक

458

येस बँकेतील आर्थिक गैरव्यवहारामुळे चिंतेत सापडलेल्या हजारो ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियासह सात गुंतवणूकदारांनी येस बँकेला वाचवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. हे सात गुंतवणूकदार येस बँकेमध्ये 11हजार 750 कोटींची गुंतवणूक करणार आहेत.

स्टेट बँकेपाठोपाठ आता खासगी क्षेत्रातील बँका येस बँकेमध्ये गुंतवणुकीसाठी पुढे आल्या आहेत. यापैकी आयसीआयसीआय बँकेने एक हजार कोटींची गुंतवणूक करण्याची तयारी दाखवली आहे. आयसीआयसीआय बँकेने शुक्रवारी शेअर बाजाराला ही माहिती दिली. या गुंतवणुकीमुळे आयसीआयसीआय बँकेची येस बँकेमधील भागीदारी 5 टक्क्यांहून अधिक होणार आहे. त्याचबरोबर एचडीएफसी बँकेने एक हजार कोटींची गुंतवणूक करून 6 टक्के भागीदारी खरेदी करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

हे गुंतवणूकदार खरेदी करणार प्रत्येकी 3 टक्के भागीदारी

आयसीआयसीआय, एचडीएफसीव्यतिरिक्त ऑक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक, राधाकिशन दमानी, राकेश झुनझुनवाला आणि अझीम प्रेमजी यांनीही येस बँकेमध्ये भागीदारी खरेदी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. हे गुंतवणूकदार प्रत्येकी 500 कोटींची गुंतवणूक करून प्रत्येकी तीन टक्के भागीदारी खरेदी करणार आहेत.

  • येस बँकेत एलआयसीकडूनही गुंतवणूक केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
  • रिझर्व्ह बँकेने येस बँकेच्या पुनर्बांधणीचा प्रस्ताक सरकारपुढे मांडला होता.
  • त्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
  • त्यानुसार येस बँक आणि सरकारला एसबीआयकडून मदत मिळणार आहे.
  • स्टेट बँक ऑफ इंडियाने 7250 कोटींची गुंतवणूक करण्यास तयारी दाखवल्यानंतर शुक्रवारी येस बँकेचे शेअर्स 10 टक्क्यांनी वधारले.
आपली प्रतिक्रिया द्या