मोदींचा ‘आडवाणी’ करण्याची योगींची तयारी! पोस्टरबाजीवरून काँग्रेस नेत्याची टीपण्णी

पुढच्या वर्षी उत्तर प्रदेशात निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी सगळ्या राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. जागोजागी बॅनर पोस्टर उभारणे हा याच तयारीचा एक भाग असून समाजवादी पक्ष आणि भाजपने खासकरून या मार्गाचा जास्त अवलंब केल्याचं दिसून येतंय. समाजवादी पक्षाने लावलेल्या फलकांवर 300 युनिट पर्यंत वीज मोफत आणि 10 लाख नोकऱ्यांचे आश्वासन देण्यात आलं आहे. भाजपने फक्त उत्तर प्रदेशच नाही तर दिल्लीतही पोस्टरबाजीला सुरूवात केली आहे. योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या कामांची प्रसिद्धी या बॅनर, पोस्टरद्वारे केली जात आहे.

भाजपच्या या बॅनरबाजीवर काँग्रेस नेत्यांनी टीका करायला सुरुवात केली आहे. या बॅनर, पोस्टर ज्या गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत, त्या खोट्या असल्याचं काँग्रेसचं म्हणणं आहे. काँग्रेसच्या युवा समितीचे अध्यक्ष बी.व्ही.श्रीनिवास यांनी या पोस्टरबाजीवरून एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलंय की ‘सरकारी पैशातून देशभरात लावण्यात आलेल्या योगी आदित्यनाथ यांच्या जाहिराती पाहून असं वाटायला लागलंय की योगी आदित्यनाथ यांनी 2024 ची आणि मोदींचा ‘आडवाणी’ करण्याची तयारी सुरू केली आहे. अन्यथा गुजरात हे नंबर.1 चं राज्य असल्याचा मोदींचा स्वयंघोषित मान हिरावून घ्यायची कोणाची हिम्मत झाली असती का’

श्रीनिवास यांच्या या ट्विटवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. यातील काहींनी त्यांच्या ट्विटरवरून काँग्रेसवर टीका केली आहे तर काहींनी त्यांची बाजू उचलून धरली आहे. एकाने या ट्विटवर प्रतिक्रिया देताना म्हटलंय की भाजपमध्ये नेतृत्व बदललं जातं, तुम्ही एकाच कुटुंबाची चाकरी करा. हरिंदर पाल नावाच्या एका युजरने ट्विटवर प्रतिक्रिया देताना प्रश्न विचारलाय की मोदींची जागा आता मार्गदर्शक मंडळात असणार आहे का ? त्यांना त्यांचे गुरु लालकृष्ण आडवाणी यांच्या जवळची जागा मिळणार का ?

योगी विरुद्ध मोदी हे चित्र कोरोना काळातील अपयश झाकण्यासाठी केलेली रणनीती – नवाब मलिक

काही दिवसापासून मोदी आणि योगी यांच्यामध्ये मतभेदाचे वातावरण असल्याच्या बातम्या देशात आणि उत्तरप्रदेशमध्ये येत आहेत परंतु कोरोना काळातील अपयश झाकण्यासाठी भाजपची ही ठरवून केलेली रणनीती असल्याची पोलखोल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.कोरोना काळात उत्तरप्रदेशमधील गंगा नदीत कोरोना बाधित लोकांचे मृतदेह फेकण्यात आल्याचे भयावह चित्र अख्खा देशाने आणि जगाने पाहिले. यामुळे योगी यांच्या कारभाराचे वाभाडे निघाले त्यामुळे हे अपयश झाकण्यासाठी मोदी विरुद्ध योगी असे चित्र उभे करण्याचा भाजपचा प्लॅन तयार असल्याचे नवाब मलिक म्हणाले.

चार वर्षांत योगींनी आपल्या कार्यकाळात फक्त राज्यात घृणा निर्माण केली आहे. सर्वसामान्य जनतेला फायदा होईल अशी एकपण योजना राबवण्यात आली नाही. कोरोनात फक्त सरकारच्या तिजोरीतील निधी मोठमोठ्या जाहिरातींवर खर्च करण्यात आला असा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे. उत्तरप्रदेशमध्ये आपला पराभव होणार हे भाजप आता समजून चुकली आहे. त्यामुळेच भाजप चिंताग्रस्त झाली आहे.मात्र उत्तरप्रदेशमध्ये भाजपाला पराभव पत्करावा लागणार हे निश्चित आहे असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या