
उत्तर प्रदेशमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने बहुमत मिळवत सत्ता कायम राखली. भाजपने 250 हून अधिक आमदार निवडून आणले. बहुमत मिळवल्यानंतर आता योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधीची जोरदार तयारी सुरू असून ते 25 मार्च रोजी लखनौच्या इकाना आंतरराष्ट्रीय मैदानावर पद आणि गोपनियतेची शपथ घेतील. योगी आदित्यनाथ दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार असून या शपथविधीसोहळ्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे.
योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधीला 12 राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. तसेच योग गुरु बाबा रामदेव यांच्यासह विविध मठांच्या आणि मंदिरांच्या महंतांच्या उपस्थितीमध्ये योगी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. यासह काही प्रमुख उद्योगपती आणि 49 कंपन्यांनाही शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण पाठवण्यात आले आहे. टाटा ग्रुपचे एन. शेखरन, अंबानी ग्रुपचे निरज अंबानी, महिंद्रा ग्रुपचे आनंद महिंद्र, बिर्ला ग्रुपचे कुमार मंगलम बिर्ला आणि गौतम अदानी हे उद्योजक या सोहळ्याला उपस्थित राहतील. तसेच सामाजिक कार्यकर्ते, लेखक, डॉक्टर आणि इंजिनिअर पदावर कार्यरत असणाऱ्या लोकांनाही आमंत्रण देण्यात आले आहे.
योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधीच्या निमित्ताने भाजपचे बडे नेते मंचावर उपस्थित असतील. शपथविधीसाठी सर्व भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. आसाम, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, उत्तराखंड, कर्नाटक, गुजरात, हरियाणा, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, मणिपूर आणि गोव्याचे मुख्यमंत्री शपथविधीला उपस्थित राहणार आहेत. तसेच उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, मुलायम सिंह यादव, बसपा प्रमुख मायावतीसह सर्व विरोधीपक्ष नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी 200 व्हीआयपींची यादी तयार करण्यात आल्याचीही माहिती मिळत आहे.
योगींचा शपथविधी सोहळा ऐतिहासिक बनवण्याची तयारी भाजपकडून करण्यात आली आहे. शपथविधी सोहळ्याला येणाऱ्या कार्यकर्त्यांना वाहनावर भाजपचा झेंडा लावण्यास सांगण्यात आले आहे. तसेच या सोहळ्यासाठी येणाऱ्या लोकांची व्यवस्था जिल्हा स्तरावर करण्यात आली आहे.
शपथविधी सोहळ्यासाठी मोठा बंदोबस्तही करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी ड्रोन तैनात करण्यात येणार असून मैदानाच्या आजूबाजूला एटीएस कमांडो आणि कमी उंचीच्या इमारतींवर शसस्त्र पोलीस तैनात असतील. सोहळ्याला जवळपास 60 हजार लोक उपस्थित राहतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

























































