विरारमध्ये तरुणाची आत्महत्या; जीवन संपण्यापूर्वी तयार केलेल्या चित्रफितीत गंभीर आरोप

पत्नीने तक्रार केल्यानंतर पोलिसाने एका तरुणाला टायरमध्ये घालून मारण्याची आणि जामीन न मिळवून देण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या तरुणाने आपल्या घरी आल्यानंतर गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी या तरुणाने एक चित्रफित तयार करून पोलिस कर्मचारी आणि पत्नीवर छळवणुकीचे आरोप केले आहेत. याप्रकरणी विरार पोलिसांनी पत्नीच्या विरोधात गुन्हा दाखल करून धमकवणाऱ्या पोलिसाची विभागीय चौकशी सुरू केली आहे.

विरार पूर्वेच्या मनवेलपाडा येथे अभय पालशेतकर (28) हा पत्नी आरोही पालशेतकर (25) हिच्यासोबत राहत होता. 11 महिन्यांपूर्वी त्यांचे लग्न झाले होते. त्यांच्यात कौटुंबिक वाद होते. शनिवारी पत्नीने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पोलिसांना अभयला बोलावून 149 अंतर्गत नोटीस देऊन समज दिली होती. नंतर घरी आल्यावर अभयने घरातील हॉलच्या छताला साडीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने एक चित्रफित तयार केली होती. पत्नीने खोटी तक्रार दिली तर सुनील पवार नामक पोलिसाने टायरमध्ये घालून मारण्याची धमकी दिल्याने मी आत्महत्या करत असल्याचे या चित्रफितीत त्याने सांगितले. ही चित्रफितीत सर्व नातेवाईकांना पाठवली होती. यामुळे शनिवारी रात्री अभयच्या नातेवाईकांनी पोलिस ठाण्यात कारवाईच्या मागणीसाठी गोंधळ घातला होता.

चौकशी सुरू
याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अभयच्या पत्नीवर विरार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मयाताचे पत्नी सोबत कौटुंबिक वाद होते त्यातून हा प्रकार घडला असल्याचे पोलिस उपायुक्त जयंत बजबळे यांनी सांगितले. पोलिसाने धमकी दिल्याचा आरोप आहे. त्याची विभागीय चौकशी करून पुढील कारवाई केली जाईल, असेही बजबळे यांनी सांगितले.

दोषींना कडक शिक्षा करा
माझ्या मुलाचा जीव पोलिसांनीच घेतला आहे. बळजबरीने सही करायला लावली. टायरमध्ये टाकून, कोंबडा करून मारेन, कसा जामीन मिळतो ते बघतो, अशी धमकी दिली त्यामुळे माझ्या मुलाने आत्महत्या केली, असा आरोप मयत अभय पालशेतकर याची आई उज्वला पालशेतकर यांनी केला आहे. ज्या पोलिसाकडे तक्रार होती तो काही बोलत नव्हता. मात्र शेजारी असलेला सुनील पवार याने माझ्या मुलाला धमकावले. त्यामुळे त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही उज्ज्वला यांनी केली.