
सामना ऑनलाईन, सत्तरी
गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर वसलेल्या सत्तरी तालुक्यातील शेळमेळावली या गावात एका २३ वर्षांच्या तरुणीचा गव्याने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. गेल्या दोन महिन्यातील ही दुसरी घटना आहे. यामुळे सत्तरी जिल्ह्यातील नागरिक भयभीत झाले असून गव्यांचा बंदोबस्त करा या मागणीसाठी ते आक्रमक झाले आहेत.
जून महिन्यात सत्तरी तालुक्यातील शिंगण या गावात ज्योती गांवकर यांचा गव्याने केलेल्या हल्ल्यात बळी गेला होता. या घटनेनंतर स्थानिक आमदार आणि आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी वनखात्याच्या वरिष्ठ अधिका-यांशी चर्चा करून गव्यांचा बंदोबस्त करण्याची सूचना केली होती. मात्र तरीही गव्यांचा बंदोबस्त करण्यात यश आलं नाही. सोमवारी पूजन मेळेकर या २३ वर्षांच्या तरुणीला स्कूटरवरून जात असताना गव्याने धडक दिली. या हल्ल्यात पूजन जखमी झाली होती. उपचारादरम्यान पूजनचा मृत्यू झाला आहे. ही बातमी कळताच सगळे ग्रामस्थ एकवटले आणि त्यांनी गव्यांच्या समस्येवर तोडगा हवा आहे असं म्हणत उग्र रूप धारण केलं. ही बातमी कळताच राणे तातडीने सत्तरीत पोहोचले. त्यांनी परिस्थिती समजून घेतल्यानंतर वन खात्याचे वरिष्ठ अधिकारी असंवेदनशील बनले आहेत अशी खंत व्यक्त केली आहे. गोवा सरकारने आता हा प्रश्न सोडवण्यासाठी शेजारी राज्य असलेल्या कर्नाटक किंवा महाराष्ट्राची मदत घ्यायचं ठरवलं आहे.


























































