22 महिलांना अश्लील व्हिडीओ पाठवून ब्लॅकमेलिंग, 19 वर्षांच्या तरुणाला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महिलांचे फोटो मॉर्फ करून त्यांना ब्लॅकमेल करणाऱ्या एका 19 वर्षांच्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याने 22 महिलांना त्रास दिल्याचं उघड झालं आहे.

14 जुलै रोजी एका विशिष्ट समुदायातील 22 महिलांनी अँटॉप हिल परिसरातील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. या तक्रारीत एका तरुणाने त्यांचे फोटो असलेल्या अश्लील व्हिडीओच्या माध्यमातून त्यांना ब्लॅकमेल केल्याचं नमूद करण्यात आलं होतं. या महिलांना इन्स्टाग्रामवरून एका तरुणाने ब्लॅकमेल केलं होतं.

तो त्यांचे फोटो मॉर्फ करून एका अश्लील व्हिडीओत टाकत असे. त्यानंतर ती क्लिप तो संबंधित महिलेला पाठवत असे. त्या व्हिडीओच्या बदल्यात तो 500 रुपये मागत असे. ते द्यायला उशीर केल्यास तो ती रक्कम दुप्पट करत असे. त्यासाठी त्याने त्यांना क्यूआर कोड देखील पाठवला होता.

पोलिसांनी क्यूआर कोडच्या माध्यमातून त्याचा माग काढला तेव्हा तो नंबर गुजरात येथील असल्याचं दिसून आलं. त्याचा मागोवा घेत पोलीस या आरोपीपर्यंत पोहोचले. या तरुणाचं नाव प्रशांत आदित्य असं आहे. तो मूळचा गुजरात येथील गांधीनगरचा आहे. तो दहावीत नापास झाल्यानंतर मास्क बनवण्याच्या कंपनीत काम करणं सुरू केलं होतं. त्यानंतर त्याने पैसे कमवण्यासाठी हा मार्ग पत्करला. पोलिसांनी प्रशांतला अटक केली आहे.