
सामना प्रतिनिधी, पुणे
लग्नास नकार मिळत असल्याने पुण्यातील एका तरुणाने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून इच्छामरणाची मागणी केली. दत्तवाडी परिसरात राहणाऱ्या तरुणाने पत्र लिहिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्वरित पत्राची दखल घेऊन पुणे आयुक्तांना कळवले. यानंतर लगेच स्थानिक दत्तवाडी पोलिसांनी या तरुणाशी संपर्क केला. त्या तरुणाचे समुपदेशन करून त्याला नैराश्यातून बाहेर काढले.
मी माझ्या नाकर्तेपणामुळे आनंदाने इच्छामरणाची मागणी करत आहे. मी नोकरी करतो आणि माझे उत्पन्न मासिक 25 हजार रुपये आहे. माझी आई 73 वर्षांची असून वडील 81 वर्षांचे आहेत. माझी घरची परिस्थिती साधारण आहे. मला माझे स्वत:चे अस्तित्व बनवायचे आहे. माझ्यामुळे कुणीही सुखी आणि समाधानी राहू शकत नाही. अगदी माझे आईवडीलसुद्धा. आईवडिलांची सेवा करणारी जोडीदार मिळत नसल्याचे त्याने पत्रात म्हटले आहे.


























































