
डांगसौंदाने येथील कोविड सेंटरला चार तरुणांनी वीज पुरवठय़ाचे जनरेटर देऊन रुग्णांचे प्राण वाचविण्याची बहुमोल कामगिरी केली आहे. त्यामुळे 16 रुग्णांच्या उपचाराचा प्रश्न दिवसभरासाठी सुटला. तसेच एका सीरियस रुग्णावर तीन तास औषधोपचार केल्यानंतर त्याला नाशिक येथे पुढील औषध उपचारासाठी स्थलांतरित करण्यात आल्याने त्याचाही जीव वाचला. त्यामुळे या तरुणांचे मोठय़ा प्रमाणावर कौतुक करण्यात येत आहे.
सटाणा तालुक्यात शनिवारी तारांना लागणाऱया झाडांच्या फांद्या कटिंग करणे व विद्युत दुरुस्तीची इतर कामे करण्यासाठी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संपूर्ण विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यामुळे सटाणा डांगसौंदाणे 33 केव्ही लाईट पूर्णतः बंद असल्याने कोविड सेंटरचा विद्युत पुरवठा 9 ते 5 वाजेपर्यंत बंद होता. यादरम्यान ग्रामीण रुग्णालयातील अधीक्षक डॉक्टर घोंगडे व कर्मचारी दुसाने यांनी गावातील जनरेटरवाल्यांना फोन करून सांगितले, मात्र जनरेटर उपलब्ध न झाल्याने त्यांनी राकेश गांगुर्डे या बॅण्ड चालकास फोन केला. त्याने ही बातमी आपले मित्र प्रशांत बोरसे, वैभव भदाने, गौरव केले यांच्या कानावर टाकली.
मग तिघांनीही क्षणाचाही विचार न करता राकेश गांगुर्डे या बॅण्ड चालकाच्या गाडीवरील जनरेटर घेतला. त्यात पेट्रोल भरून जनरेटर सुरू केला. त्यामुळे कोविड सेंटरमधील 16 रुग्णांसाठी ऑक्सिजन व व्हेंटिलेटर सुरू करण्यास मदत झाली आणि रुग्णांचे जीवही वाचले. त्यात एक रुग्ण अतिशय सीरियस असल्याने त्याच्यावर डॉक्टर घोंगडे व त्यांच्या कर्मचाऱयांनी तीन तास उपचार करून पुढील उपचारासाठी नाशिक येथे पाठविले. त्यामुळे या रुग्णाचे जीव वाचल्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

























































