
सामना प्रतिनिधी । राहुरी
देवीच्या मुर्तीचे विसर्जन करण्यासाठी मुळा धरणावर गेलेल्या राहुरीचा शहारूख शेख या तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. धरणाच्या खोल पाण्यात शोध मोहिमेनंतर सायंकाळी ६ वाजता मृतदेह हाती लागला. दोन दिवसांपूर्वी मुळा धरणाच्या पाण्यात राहुरी फॅक्टरी येथील तरूणाने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा पाण्यात तरूण बुडाल्याने मुळा धरणाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
शुक्रवारी दुपारी सव्वाचार वाजण्याच्या सुमारास मुळा धरणाच्या चमोरी गेष्ट हाऊस समोरील पाण्यात ही घटना घडली. राहुरीच्या मल्हारवाडी रस्त्यालगत नवरात्रोत्सव साजरा करण्यात आला. आज देवीचा मुर्ती विसर्जन करण्यासाठी शहारूख शेख राहणार राहुरी हा मित्रांसमवेत मुळा धरणावर गेला होता. दुपारी चमोरी गेस्ट हाऊस समोरील धरणाच्या पाण्यात ही मुले उतरली होती.
दरम्यान, शहारूख यास पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. या ठिकाणी पाण्याची खोली मोठी असल्याने शहारूख याच्या शोधार्थ पाण्यात उतरण्याचे धाडस काही काळ झाले नाही. या घटनेची खबर मिळताच पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल संजय जाधव, पोलीस नाईक कल्लू चव्हाण यांनी मुळा धरणावर दाखल होऊन धरणाच्या पाण्यात पोहणाऱ्यांना घटनास्थळी पाचारण केले. बुडालेल्या शहारूख शेखचा मृतदेह १ तासाच्या प्रयत्ना नंतर हाती लागला
धरणाच्या पाण्यात पोहणारे आसाराम माळी, शक्ती गंगे, संतोष गायकवाड, गणेश मोरे यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. होडीच्या मदतीने पाण्यात शोध घेतला असता सायंकाळी ६ वाजता शहारूखचा मृतदेह हाती लागला. यावेळी मुळानगरचे माजी सरपंच अंकुश बर्डे, माजी उपनगराध्यक्ष आर.आर.तनपुरे, ग्रामपंचायत सदस्य सलिम शेख, गणेश मोरे, बाबा शिंदे यांनी मदतकार्य केले.
वास्तविक मुळा धरणाच्या धोकादायक ठिकाणी पाटबंधारे विभागाने सूचना फलक लावलेले आहेत. तसेच धरणाची सुरक्षितता अबाधित राहण्यासाठी सी.सी.टी.व्ही.कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मात्र धरणाच्या पाण्यात बुडणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे.



























































