
बऱ्याचदा प्रवासात अनोळखी लोकांसोबत न बोलण्याचा किंवा त्यांच्याकडून खाद्यपदार्थ न स्वीकारण्याचा सल्ला दिला जातो. हा सल्ला सध्याच्या घडीला बाळबोध वाटला तरी तो पाळणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे.
हिंदुस्थान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, हा 22 वर्षांचा तरुण मुरादाबादहून चंदिगड येथे आपल्या आईला भेटायला आला होता. ट्रेनने चंदिगड येथे पोहोचल्यानंतर त्याला पोटात वेदना जाणवू लागल्या. त्यामुळे तो तेथील पंचकुला रुग्णालयात तपासणीसाठी दाखल झाला. डॉक्टरांनी त्याचा एक्स रे काढल्यानंतर त्यांना धक्काच बसला. कारण त्याच्या गुदद्वारात एक काचेची बाटली असल्याचं एक्स-रे अहवालात दिसत होतं.
डॉक्टरांनी तरुणाला याबाबत विचारणा केली असता त्याने ट्रेन प्रवासातील काही सहप्रवाशांवर संशय व्यक्त केला. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने सरळ पोलिसांकडे याची तक्रार केली. पोलिसांनी तरुणाची तक्रार नोंदवून घेत त्याला संपूर्ण घटनाक्रम विचारला. तेव्हा तो म्हणाला की, उत्तर प्रदेशहून चंदिगडला येतेवेळी ट्रेनमध्ये त्याला काही जणांचं टोळकं भेटलं होतं. त्यांच्याकडे दारूच्या बाटल्या होत्या. त्यांच्यासोबत तोही दारू प्यायला आणि त्यानंतर त्याची शुद्ध हरपली.
शुद्ध हरपल्यानंतर त्या टोळक्यानेच त्याच्या गुदद्वारात बाटली घातली असावी, असा संशय या तरुणाने व्यक्त केला आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.




























































