
सामना ऑनलाईन । चंदिगड
चंदिगड येथे वाढदिवसाची मिठाई दिली नाही म्हणून एका तरुणाची ४० वार करून हत्या झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. सूरज (18), अखिलेश (19) आणि राम आशीष उर्फ कालू (18) अशी या तीन आरोपींची नावं आहेत.
चंदिगडमधील धनास कुरिअर बॉय म्हणून काम करणाऱ्या संदीप यादव याची हत्या झाली होती. त्याच्या मृतदेहावर 40 वार आढळले होते. या प्रकरणी तपास करत असताना पोलिसांना 4 ऑक्टोबर रोजी घडलेल्या एका घटनेचा संदर्भ मिळाला होता. 4 ऑक्टोबर रोजी संदीप याच्या छोट्या भावाचा वाढदिवस होता. त्यासाठी तो त्याच्या शेजारीपाजारी मिठाई वाटत होता. याच दरम्यान, सूरजच्या लहान भावाचं संदीपशी मिठाई न देण्यावरून भांडण झालं. भांडणाचं पर्यवसान हाणामारीतही झालं. मात्र, दोघांच्या कुटुंबीयांना मध्ये पडत ते भांडण मिटवलं होतं.
यानंतर तिन्ही आरोपींनी संदीप याच्या हत्येचा कट रचला. 12 ऑक्टोबर रोजी रात्री तिन्ही आरोपींनी एका दारुच्या गुत्त्यावर दारू प्यायली. तिथून घरी परतत असताना त्यांना संदीप भेटला. ते त्याच्याशी गोड बोलून ते त्याला एका बागेत घेऊन गेले. तिथे गेल्यावर या तिघांनी त्याला बेदम मारहाण केली. त्या मारहाणीमुळे तो गंभीर जखमी झाला. त्याला तशाच अवस्थेत टाकून ते तिथून पळाले. पण, जर संदीप यातून वाचला तर त्यांना शिक्षा होईल, या भीतीने ते तिघेही पुन्हा बागेत आले आणि त्यांनी बर्फ फोडायच्या टोच्याने संदीपवर 40 वार केले आणि तिथून फरार झाले.
summary- youth got killed over denying sweets























































