
सोने चोरीच्या संशयावरून तरुणाची हत्या केल्याप्रकरणी तिघांना क्राइम ब्रँच युनिट-8 ने अटक केली. गणेश संदीप गोलतकर असे मृताचे नाव आहे. त्याच्या हत्येप्रकरणी याकूब इम्जियाज खान, साकीर साबीर कुरेशी आणि पूनम सतीराम भारद्वाजला अटक करून वाकोला पोलिसांच्या ताब्यात दिले. तिघांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
गणेश हा पश्चिम द्रुतगती महामार्गावरील फुटपाथवर राहत होता. तो कचरा वेचण्याचे काम करत होता. 3 ऑक्टोबरला गणेशचे काही जणांसोबत भांडण झाले होते. तीन जणांनी गणेशला मारहाण केली होती. मारहाणीच्या घटनेनंतर गणेश गायब झाला होता. त्याच्याबाबतीत घातपात झाला असावा अशी माहिती युनिट-8 चे पोलीस शिपाई योगेश सटाले यांना मिळाली. या माहितीनंतर गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी गणेशचा शोध घेण्यास सुरुवात केली. यावेळी गणेश हा याकूब, पूनम आणि साकीरशी झालेल्या भांडणानंतर गायब झाल्याची माहिती मिळाली. त्याआधारे पोलिसांनी तिघांची शोधमोहीम हाती घेतली. प्रभारी पोलीस निरीक्षक मधुकर सानप, पोलीस निरीक्षक दीपक सावंत, योगेश सटाले यांच्या पथकाने तिन्ही आरोपींना अंधेरी आणि सांताक्रुझ येथून ताब्यात घेतले. चौकशीवेळी तिघांनी गणेशच्या हत्येची कबुली दिली.
गणेशने पूनमचे दागिने चोरल्याचा याकूबला संशय होता. त्यामुळे त्या तिघांनी गणेशला मारहाण करून रिक्षात काsंबले. धावत्या रिक्षात केलेल्या मारहाणीत गणेशचा मृत्यू झाला. त्यानंतर त्या तिघांनी गणेशचा मृतदेह वाकोला येथील फुटपाथवर टाकून पळ काढला.




























































