
दररोज 180 ते 190 किलोमिटर सायकलींग
हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकजण आपआपल्या व्यापात व्यस्त आहे. आवडीच्या, छंदाच्या गोष्टी करण्यासाठी तर सोडाच पण व्यायाम, योगा करण्यासाठी वेळ काढणे अवघड झाले आहे. मात्र, धाराशिव येथील 17 तरुणाच्या समुहाने आपल्या दैनंदीन कामकाजातून वेळ काढून नुकतीच धाराशिव ते कन्याकुमारी हे सुमारे 1 हजार 400 किलोमिटरचे अंतर सायकलद्वारे केवळ 8 दिवसात पूर्ण केले आहे. सायकलींगचा छंद जोपासण्या बरोबरच सायकल चालविने हा एक उत्कृष्ट व्यायाम असल्याने यातून दोन्हीही गोष्टी साध्य झाल्या आहेत. या युवकांचीही ही कन्याकुमारीची सफर धाराशिव जिल्ह्यामध्ये कुतहलाचा विषय बनली आहे.
धाराशिव शहरासह परिसरातील कांही तरुण ’उस्मानाबाद मॅरेथॉन’ च्या आयोजनाच्या निमित्ताने एकत्र आले. व्यायाम, आरोग्याबद्दल जनजागृती व्हावी, लोकांनामध्ये याची आवड निर्माण व्हावी यासाठी या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. मॅरेथॉनला नागरीकांचा उर्स्पुâत प्रतिसाद मिळाला. या तरुणांनी मॅरेथॉनच्या यशस्वी आयोजनानंतर सायक्लोथॉनचेही आयोजन केले. परंतू या पुढेही जावून आपण स्वतःही कांहीतरी केले पाहिजे असा विचार या तरुणांच्या मनात कायम होता.
2021 सालच्या जुलै महिन्यात या तरुणांनी प्रथम धाराशिव ते रायगड ही 380 किलोमिटरची मोहिम आखली. यासाठी तीन महिने पुर्वीपासून दररोज 80 ते 100 किलोमिटर सायकल चालविण्याचा सराव केला. 8 जुलै 2021 रोजी हे तरुण धाराशिवहून रायगडासाठी सायकलवर निघाले. पहिल्या दिवशी 140 कि.मी., दुसर्या दिवशी 130 कि.मी. तर तिसर्या दिवशी 110 किलोमिटर सायकल प्रवास करुन हे तरुण रायगडवर पोहंचले. ही मोहिम यशस्वी झाल्यानंतर या तरुणांचा विश्वास वाढला, यापुढे अजून लांबच्या मोहिम आखण्याचे ठरले.
2023 सालच्या सुरुवातीच्या कांही दिवसातच या तरुणांनी पुन्हा कन्याकुमारी मोहिम ठरली. 1 हजार 400 किलोमिटरचे अंतर होते, त्यामुळे काटेकोर नियोजन गरजेचे. पुर्ण नियोजन, अभ्यास झाल्यानंतर ऑगस्टमध्ये मोहिम काढण्याचे ठरले. यासाठी सुमारे 6 महिने दररोज शंतर ते सव्वाशे किलोमिटर सायकलींगचा सराव करण्यास प्रारंभ केला. 4 ऑगस्ट 2023 रोजी धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासापून या तरुणांनी आपल्या सायकल प्रवासास प्रारंभ केला. दररोज सुमारे 180 ते 190 किलोमिटर सायकल प्रवास करत दहा दिवसा ऐवजी केवळ आठच दिवसात म्हणजेच 11 ऑगस्ट रोजी दुपारी 2 च्या सुमारास हे तरुण कन्याकुमारीला पोहंचले.
प्रवासा दरम्यान असा होता दिनक्रम
प्रवासा दरम्यान हे तरुण दररोज पहाटे ४ वाजता सायकल प्रवास सुरु करत असत. पहाटे 4 ते 10 पर्यंत सुमारे 120 किलोमिटरचे अंतर ते पार करत होते. त्यानंतर नाष्टा व थोडा आराम. पुन्हा 11 ते दुपारी 2 सायकलींग, दुपारी 2 ते 3 जेवन व नंतर दुपारी 3 ते 5 पुन्हा सायकलींग. असे एका दिवसात हे तरुण सुमारे 180 ते 190 मिलोमिटर अंतर कापत होते. तसेच आहारात कांही बदल होवू नये यासाठी आचारी, जेवन बनविण्यासाठी लागरे साहित्य, सायकलमध्ये कांही खराब झाल्यास किरकोळ दुरुस्तीचे साहित्य ते एका टेम्पोमध्ये सोबत घेवून गेले होते.
तीन राज्यातून प्रवास
या सायकल स्वारांनी महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू अशा तीन राज्यातून प्रवास केला. धाराशिव येथून सुरु केलेला हा प्रवास विजापूर, होस्पेट, हंपी, चित्रदुर्ग, यशवंत पुरम, धर्मापुरी, सेलम, दिंडीगुल, मदुराई, सत्तूर मार्गे कन्याकुमारी पर्यंत पोहंचला. हा सर्व प्रवास शक्यतो राष्ट्रीय महामार्गावरुन करण्यात आला. या सर्व प्रवासादरम्यान या सायकल स्वारांनी सुमारे 240 ते 250 उड्डानपुल पार केले. तसेच पहाटे लवकर सायकलींग सुरु करण्यात येत असल्याने सर्व सुरक्षा उपायांचा अवलंब ते तरुण करत होते.
54 वर्षाचे तरुण – चित्रसेन राजेनिंबाळकर
हे सर्व तरुण 35 च्या पुढील आहेत. यामध्ये वयाने सर्वात कमी असणारे रणजीत पाटील हे 35 वर्षाचे तर सर्वात जेष्ठ चित्रसेन राजेनिंबाळकर हे 54 वर्षाचे आहेत. चित्रसेन राजेनिंबाळकर यांनी 54 व्या वर्षी धाराशिव ते कन्याकुमारी ही सायकल मोहिम पुर्ण केली आहे. त्यांची ’फिटनेस’ ही सध्याच्या तरुणाईला विचार करण्यास भाग पाडणारी आहे.
आवड असली की सवड मिळतेच
या 17 तरुणामध्ये 5 तरुण हे शासकीय नौकरीत, 8 तरुण व्यावसायीक, 2 अभियंते तर 1 बँकर आहे. या सर्वांनी दैनंदीन कामकाजातून वेळ काढून सराव करुन या मोहिमेसाठी सुमारे 10 ते 12 दिवसाचा वेळ काढला. त्यामुळे सध्या आपण कितीही धावपळीचे, व्यस्त जीवन जगत असलो तर आवड असली की सवड मिळतेच हेच या सर्वांनी दाखवून दिले आहे.
धाराशिव ते कन्याकुमारी सायकल मोहिमेत यांचा सहभाग
चित्रसेन राजेनिंबाळकर, प्रदीप खामकर, अमोल माने, दिग्विजय घुटे-पाटील, पुरुषोत्तम रुकमे, रणजीत रणदिवे, दत्तात्रय टेकाळे, सुरज कदम, विशाल थोरात, दीपक वळसे, गणेश एकंडे, अभिजीत पाटील, महेश पवार, इंद्रजीत पाटील, अमोल निरपळ, अजय देसाई व दीपक चव्हाण.
ही कन्याकुमारी मोहिम माझ्यासाठी खूप अविस्मरणीय झाली. वैयक्तीक क्षमता तपासण्याची संधी या निमित्ताने मिळाली. सायकलींगची आवड असल्याने व याद्वारे व्यायामही होत असल्याने कायम उत्साही वाटते. सध्याच्या तरुणाईने अशा गोष्टीसाठी वेळ काढणे गरजेचे आहे.
– रणजीत छत्रपती रणदिवे, सहभागी तरुण.



























































