औराद शहाजानी येथील चोरी प्रकरणी लातूरच्या युवकास अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । लातूर

निलंगा तालूक्यातील औराद शहाजानी येथील बाजारातील तीन दुकाने १४ फेब्रुवारी रोजी फोडण्यात आली होती. सदरील चोरी प्रकरणी लातूरातील युवकास पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून ८ हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत.

औराद शहाजानी पोलीस ठाण्यात कविता भरतकुमार बियाणी यांनी आपल्या दुकानातील चोरी प्रकरणी तक्रार दाखल केली होती. १४ फेब्रुवारी रोजी रात्री दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून रोख १० हजार रुपये तसेच सिगारेटची पुडे १० हजार रुपयाचे पळवण्यात आले होते. यासोबतच इतर दोन दुकानेही फोडण्यात आलेली होती. सदरील चोरी ही लातूरातील मिस्कीनपुरा भागात राहणाऱ्या गणेश उर्फ पोपट्या बालाजी चिमकुले याने केल्याची माहिती मिळाल्यावरुन स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकांनी त्यास ताब्यात घेतले. सदरील गुन्हा केल्याची कबुली त्यांनी दिली असून त्याच्याकडून रोख ८००० रुपये जप्त करण्यात आले आहेत. त्यास औराद शहाजानी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. गणेश उर्फ पोपट्या चिमकुले यास अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक सुनिल नागरगोजे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, कर्मचारी अंगद कोतवाड, राजू टेकाळे, रामहरी भोसले, सदानंद योगी, खुर्रम काझी, राजेश कंचे, रियाझ सौदागर, गणेश साठे, नागनाथ जांभळे यांनी परिश्रम घेतले.