
देशात आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. मुंबईत तर हे प्रमाण जास्तच आहे. दरम्यान पश्चिम उपनगरातील एका 15 वर्षांच्या मुलीने एप्रिलच्या सुरुवातीला आत्महत्या केली होती. तर दुसरीकडे पूर्व उपनगरात नववीच्या विद्यार्थिनीने ब्लॅकमेलिंगला कंटाळून जीवन संपवलं होतं. या दोघींनी मुंबईत आत्महत्या हत्या केली होती. मात्र हे पहिल्यांदा घडलं नाही. अशा घटना वारंवार घडत आहेत.
मुंबई पोलिसांच्या आकडेवारीनुसार, अल्पवयीन मुलीचे आत्महत्येचे प्रमाण पूर्वीपेक्षा जास्त वाढले आहे. मागील 4 वर्षांत अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे. 2019 आणि 2022 दरम्यान 188 मुलांनी आत्महत्या केल्या आहेत. याच काळात मुलींनी आत्महत्या करण्याचे प्रमाण 23% वाढले असून 231 अल्पवयीन मुलींनी आपले जीवन संपवले आहे. प्रौढांमध्ये मात्र याउलट स्थिती आहे.
आत्महत्येचे सर्वाधिक प्रमाण असलेल्या हिंदुस्थानातील पाच शहरांमध्ये मुंबईचा समावेश होतो. 2019 साली 1299 लोकांनी आत्महत्या केल्या होत्या. 2022 साली यात 22 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली असून 2019 च्या तुलनेत 2022 साली एकूण 1499 लोकांनी आत्महत्या केल्या आहेत. याच चार वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास महिलांच्या तुलनेत पुरुषांनी जास्त आत्महत्या केल्याचे दिसून आले आहे. या चार वर्षांत मिळून एकूण 1263 महिलांनी आत्महत्या केल्या होत्या. याच काळात आत्महत्या करणाऱ्या पुरुषांची संख्या ही 3765 इतकी होती.
कौटुंबिक समस्या आणि आर्थिक समस्या ही आत्महत्येमागची मुख्य कारणे आहेत. अल्पवयीन मुलींमध्ये आत्महत्येचे प्रमाण वाढण्याची कारणे वेगळी असू शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सांताक्रूझच्या एलएस रहेजा कॉलेजमधील समाजशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. साम्या शिंदे यांनी सांगितले की, तणाव, नातेसंबंधांमध्ये उद्भवलेल्या अडचणी, कौटुंबिक अडचणी यामुळे काहीजण टोकाचे पाऊल उचलताना दिसत आहे.”


























































