एम.एम.एस. अभ्यासक्रमाच्या परीक्षा पुढे ढकला, युवासेनेची मागणी

मुंबई विद्यापीठाच्या दुरस्थ शिक्षण विभाग (आयडॉल) येथील एम.एम.एस. या अभ्यासक्रमाच्या पहिल्या सत्राच्या परीक्षा येत्या 10 फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत. विद्यार्थ्यांना स्टडी मटेरियल उशिरा उपलब्ध झाल्यामुळे या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी युवासेनेने कुलगुरू डॉ. प्रा. रवींद्र कुलकर्णी यांच्याकडे केली आहे.

मुंबई विद्यापीठाच्या एम.एम.एस. या अभ्यासक्रमाच्या पहिल्या सत्राच्या परीक्षा 10 फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत. काही विद्यार्थ्यांनी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे केलेल्या तक्रारीनुसार निदर्शनास आले की, एम.एम.एस. या अभ्यासक्रमाचे प्रवेश उशिरापर्यंत सुरू होते. शिवाय विभागाकडून देण्यात येणारे स्टडी मटेरियल आजतागायत पूर्णपणे देण्यात आलेला नाही. जवळपास तीन विषयांचे अजूनही प्रलंबित आहे. जे देण्यात आले आहे ते मागील एका महिन्यात दिले आहेत. या पार्श्वभूमीवर आयडॉल येथे प्रवेश घेणारे विद्यार्थी गरीब होतकरू असल्याने नोकरी करून आपले शिक्षण पूर्ण करीत असतात. स्टडी मटेरियल उशिरा मिळाल्यामुळे या विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यास पुरेसा अवधी मिळाला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना सर्व स्टडी मटेरियल आधी उपलब्ध करून देण्यात यावा. त्यानंतरच परीक्षा घेण्यात याव्यात, अशी मागणी युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत आणि माजी सिनेट सदस्य राजन कोळंबेकर यांनी कुलगुरू डॉ. प्रा. रवींद्र कुलकर्णी यांना निवेदनाद्वारे केली आहे.

लवकरच स्टडी मटेरियल उपलब्ध होणार

युवासेना निवेदन दिल्यानंतर कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे तसेच आयडॉलचे डायरेक्टर डॉ. सलगर यांच्यासोबत दूरध्वनीद्वारे संपर्क साधला. लवकरच सर्व स्टडी मटेरियल विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करू, असे आश्वासन त्यांच्याकडून युवासेनेला देण्यात आले आहे.