
सामना प्रतिनिधी । पंढरपूर
आषाढीवारीचा सोहळा साजरा करुन वारकरी पंढरीचा निरोप घेण्याच्या तयारीत असताना, मराठा आंदोलकांनी दिलेल्या ‘महाराष्ट्र बंद’च्या हाकेमुळे अचानक एस.टी. बस सेवा बंद ठेवण्यात आली. अनपेक्षित पडलेल्या मुक्कामात वारकऱ्यांची उपासमार होऊ नये म्हणून युवासेनेचे सरचिटणीस अतुल राजूरकर यांनी जेवणाची व्यवस्था उपलब्ध करुन दिली.
आषाढी वारीच्या घाईगर्दीत मराठा संघटनांनी मुख्यमंत्र्यांच्या महापूजेला विरोध करीत एस.टी. बससेची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. आंदोलन हिंसक होत असल्याने पोलिसांनी भाविकांच्या सुरक्षेसाठी बस वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. अचानक घेतलेल्या निर्णयामुळे गावी परतण्यासाठी निघालेल्या वारकऱ्यांची धांदल उडाली. वारीसाठी उभारलेल्या तात्पुरत्या बस स्थानकांवर मुक्कामाची व भोजनाची कसलीही व्यवस्था नसल्याने वारकरी भाविकांचे झोपण्याचे आणि पोटापाण्याची हाल झाले. ही गैरसोय लक्षात घेऊन युवा सेना वारकऱ्यांच्या मदतीला धावून गेली आणि उपाशीपोटी पंढरीचा निरोप घेणाऱ्या वारकऱ्यांना आत्मा तृप्त होई पर्यत भोजन व्यवस्था उपलब्ध करून दिली.
युवा सेनेच्या या भोजन व्यवस्थेमुळे वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. या उपक्रमासाठी दिंगबर चोरमुले, शरद राजुरकर, सुनील सोनार, किरण सोनार, राहुल राजुरकर संभाजी राजुरकर,शेखर राजुरकर सर, विवेक जगताप सर, प्रशांत आसबे, अमृत राजुरकर, संदेश सोनार, अनिकेत चाडोले, चिन्मय भोसले , आकाश सोनार, अमर राजुरकर व सारंग राजुरकर आदींनी परिश्रम घेतले.



























































