युवासेना चषकावर अर्णव मराठाचे नाव

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित युवासेना चषकावर अर्णव संघाने आपले नाव कोरले. त्यांनी श्रीजा इलेव्हनचा पराभव करत 50 हजारांचे रोख इनामही जिंकले. या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार रोहित मानेने पटकावला तर श्रेयस कदम उत्कृष्ट फलंदाज तर लकी सिंग उत्कृष्ट गोलंदाज ठरला.

परळ-लालबागमधील युवा क्रिकेटपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी साई गणेश स्पोर्ट्स क्लब यांच्या सहकार्याने आयोजित युवासेना चषक स्पर्धेत विभागातील तगडय़ा 16 संघांनी सहभाग नोंदवला होता. युवासेना सहसचिव मुकेश कोळी यांनी आयोजित केलेल्या या दिमाखदार स्पर्धेला आदित्य ठाकरे यांचीही उपस्थिती लाभली होती. या स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळय़ाला शिवसेना सचिव- आमदार वरुण सरदेसाई, शिवसेना सचिव सुधीर साळवी, सूरज चव्हाण, शिवसेना उपनेते अमोल कीर्तिकर, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, उपविभागप्रमुख गजानन चव्हाण, पराग चव्हाण, बबन गावकर, निरंजन नलावडे आणि शाखाप्रमुख मिनार नाटळकर यांची उपस्थिती लाभली.