धोनी एका दिवसात बनत नाही, पंतवर दबाव टाकू नका! – सिक्सर किंग

789

टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) याच्या खराब खेळीवरून सध्या त्याच्यावर प्रचंड टीका होत आहे. चौफेर टीका होत असताना मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींसह माजी खेळाडू व्ही.व्ही.एस लक्ष्मणने त्याची बाजू घेतली. आता टीम इंडियाचा ‘सिक्सर किंग’ युवराज सिंह (Yuvraj Singh) यानेही त्याची बाजू घेत त्याला जपण्याचा सल्ला दिला आहे. पंतवर काम सुरू असून त्याच्यावर अतिरिक्त दबाव टाकू नका असेही युवराज म्हणाला आहे.

युवीची जर्सी रिटायर्ड करा! गौतम गंभीरची बीसीसीआयकडे मागणी

ऋषभ पंतकडे टीम इंडियाचा माजी यष्टीरक्षक एम.एस. धोनीला पर्याय म्हणून पाहिले जाते. परंतु त्याच्या गैरजबाबदार फलंदाजीमुळे त्याच्या संघातील स्थानावरही प्रश्न उपस्थित होत आहेत. पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर पंतचे फॉर्मात येणे महत्त्वाचे आहे. अन्यथा त्याला संघातून डच्चूही मिळण्याची शक्यता आहे. याच संदर्भात दिल्लीमध्ये बोलताना युवराजने त्याच्यावर टीका करू नका असे म्हटले आहे.

युवराज म्हणाला की, पंतशी सध्या एखाद्याने चर्चा करण्याची आवश्यकता आहे. तसेच पंतची धोनीसोबत तुलना करू नये असेही नका. कारण धोनी एका दिवसात नाही बनलेला. त्याला सर्वोत्तम खेळाडू बनण्यासाठी अनेक वर्ष लागली. त्यामुळे त्याला पर्याय मिळण्यासही काही काळ जावू द्यावा लागेल. वर्ल्डकपसाठी अजून एक वर्षाचा अवधी असल्याने पंतवर काम करण्यास बराच वेळ असल्याचेही तो म्हणाला. तसेच त्याच्यावर दबाव टाकत गेल्यास तो आपला सर्वोत्कृष्ठ खेळ करू शकणार नाही, असेही युवी म्हणाला.

आपली प्रतिक्रिया द्या