झवेरी बाजारात स्कूटरबॉम्बचा स्फोट घडविणारा आरोपी 27 वर्षांनी सापडला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील 1993च्या महासंहारक बॉम्बस्फोट मालिकेतील फरार आरोपी मुनाफ अब्दुल माजीद हलारी यास गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाने रविवारी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केली. तब्बल 27 वर्षांनंतर मुनाफ सापडला. कुख्यात टायगर मेमनच्या इशाऱयावरून अमली पदार्थ व स्फोटकांची तस्करी करणाऱया या आरोपीकडे पाकिस्तानी पासपोर्ट सापडला असून गुजरात एटीएस त्याची कसून चौकशी करीत आहे.

मुनाफ हलारी हा मूळचा गुजरातच्या अमरेलीचा असून 1993च्या मुंबईतील महासंहारक बॉम्बस्फोट मालिकेतील हा एक प्रमुख आरोपी आहे. झवेरी बाजार येथे त्याने तीन नव्या स्कूटरमध्ये टायमर ठेवून बॉम्बस्फोट घडवून आणले होते. त्यात 17 जणांचा जागीच मृत्यू झाला होता, तर 57 लोक गंभीर जखमी झाले होते. तेव्हापासून हा आरोपी फरार होता.

त्याने मुंबई सोडली

मुंबईत बॉम्बस्फोट घडविल्यानंतर मुनाफ उत्तर प्रदेशातील बरेलीला पळाला. तिकडून तो बँकॉकला स्थिरावला. त्यानंतर टायगर मेमनने त्याला पाकिस्तानी पासपोर्ट मिळवून दिला. पाकिस्तानी नागरिक असल्याची कागदपत्रे बाळगून त्याने केनियामध्ये आश्रय घेतला आणि तिथेच धान्याचा आयात-निर्यातीचा व्यवसाय सुरू केला.परंतु मेमनच्या सांगण्यानुसार तो या व्यवसायाआड छुप्या रीतीने अमली पदार्थ व स्फोटकांची तस्करी करीत होता. याची खबर मिळताच गुजरातच्या एटीएसने मुनाफला मुंबई विमानतळावरून ताब्यात घेतले.

टायगर मेमनला धक्का

तब्बल 27 वर्षांनी मुंबईतील बॉम्बस्फोटांतील फरार आरोपीला गुजरात पोलिसांनी अटक केली याचा टायगर मेमनला धक्का बसला असल्याचे गुजरात पोलिसांनी सांगितले.