कास्टिंग डायरेक्टरने काढायला लावलेले कपडे, अभिनेत्याने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिग बॉस ओटीटी मधून प्रसिद्ध झालेला अभिनेता झीशान खान याने त्याच्यासोबत घडलेला कास्टिंग काऊचचा अनुभव शेअर केला आहे. एका चित्रपटासाठी तो जेव्हा ऑडिशन द्यायला गेला तेव्हा तेथील कास्टिंग डायरेक्टरने त्याला कपडे काढायला सांगितले होते. मात्र झीशानने त्याला नकार देत तो प्रोजेक्ट सोडून दिला होता.

‘मी ऑडिशनला गेलो तेव्हा ते कास्टिंग डायरेक्टर एका व्यक्तीला बोलले की कॉलेज बॉय म्हणून हा मला योग्य वाटतोय. त्यानंतर त्यांनी मला माझी बॉडी बघायची म्हणून मला शर्ट काढायला सांगितले. त्यानंतर त्यांनी मला तुझे पाय बघायचे आहेत असे सांगितले. त्यावरून मला समजले की त्यांना मला पँट काढायला सांगायचे आहे. त्यामुळे मी त्यांना थेट नकार दिला. मी हे करू शकत नाही असे सांगितले. त्यांना माझ्या बोलण्यातील दुसरा अर्थही समजला. मी त्यांच्या मनात असलेले काहीही करू शकत नसल्याचे सजल्यानंतर त्यांनी थेट मला सांगितले की असं करूनच अनेक कलाकार मोठे झाले आहेत. त्यामुळे तु देखील कर’ असे झीशानने झूम वरून झालेल्या एका मुलाखतीत सांगितले.

त्यानंतर झीशानने तो प्रोजेक्ट सोडला. ‘मी त्या कास्टिंग डायरेक्टरला थेट नकार दिला. मी त्याला सांगितले की मी काम मिळविण्यासाठी कोणत्याही प्रकारचे कॉम्प्रमाईज करणार नाही. त्यामुळे मला तो प्रोजेक्ट सोडावा लागला’, असे झीशानने सांगितले.