शाळेची भिंत कोसळल्याने विद्यार्थी उघडय़ावर; नगर तालुक्यातील जांब येथील घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर तालुक्यातील जांब येथील जिल्हा परिषद शाळेची धोकादायक भिंत वर्गातच कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने ही भिंत रात्रीच्या वेळी कोसळल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. परंतु एकच शाळेची खोली पडली असल्याने विद्यार्थी उघडय़ावर पडले आहेत. दरम्यान, या प्रकरणामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांच्या इमारतींचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. तर दुसरीकडे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी प्रशासनाला धारेवर धरत आंदोलनाचा इशारा दिला आहे.

नगर तालुक्यातील कौडगाव ग्रुप ग्रामपंचायतमधील जांब येथे जिल्हा परिषदेची द्विशिक्षकी प्राथमिक शाळा आहे. या शाळेच्या 2 खोल्या सुमारे 60 वर्षांपूर्वी बांधलेल्या आहेत. त्या दोन्ही खोल्या धोकादायक झाल्याने त्या पाडून तेथे नव्या दोन खोल्या मंजूर कराव्यात, याबाबत तेथील स्थानिक नागरिक तसेच तत्कालीन पंचायत समिती सभापती सुरेखा गुंड यांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे केली होती. त्याबाबतचा प्रस्तावही पाठविण्यात आलेला होता. जिल्हा परिषद प्रशासनाने त्यातील एक खोली पाडण्यास मंजुरी दिली होती, त्यामुळे ती पाडण्यातही आली होती. त्यामुळे एकाच खोलीत इयत्ता 1ली ते 4थी पर्यंतचे विद्यार्थी बसत होते.

रविवारी रात्रीच्या सुमारास अचानक त्या एका खोलीचे छत व भिंत कोसळली. भिंतीचे दगड व छताचे पत्रे खोलीत पडले. सोमवारी सकाळी ही बाब निदर्शनास आली. या घटनेची माहिती मिळाल्यावर माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, शरद झोडगे, माजी सभापती संदीप गुंड, युवा उपजिल्हाधिकारी सोमनाथ कांडके आदींनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच एकमेव शाळा खोलीही पडल्यामुळे शाळा उघडय़ावर आली असून, शिवसेनेच्या पदाधिकाऱयांनी शेजारी असलेल्या 2 खासगी खोल्यांमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांची बसण्याची व्यवस्था केली आहे.

निंबोडीची पुनरावृत्ती झाली असती

नगर तालुक्यातील निंबोडी येथे काही वर्षांपूर्वी शाळेची भिंत अंगावर कोसळून 3 विद्यार्थी मयत झाले होते. त्या घटनेसारखीच ही घटना घडली. मात्र, या ठिकाणी रात्रीच्या वेळी ही भिंत कोसळल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.

जांब, सारोळा बद्धी याशिवाय इतरही धोकादायक शाळा खोल्या असून, त्या तातडीने पाडाव्यात व तेथे नव्याने शाळा खोल्यांना मंजुरी देण्यात यावी. निंबोडी दुर्घटनेनंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱयांनी व ग्रामस्थांनी शिर्डीला पायी मोर्चा नेला होता. त्यावेळी शिर्डी संस्थानने 30 कोटी रुपयांचा निधी शाळा खोल्यांसाठी मंजूर केला. मात्र, जिल्हा परिषद प्रशासनाने पहिल्या टप्प्यातील 10 कोटीही अजून खर्च केले नाहीत, त्यामुळे जनहिताची कामे रखडली आहेत.