
गेली आठ वर्षे बंद असलेले आझाद मैदानातील महापालिकेचे क्रीडा भवन आता लवकरच सुरू होणार आहे. क्रीडा भवनाच्या कार्यकारिणीची निवडणूक घेतली जाणार असून त्यासाठी महापालिका आयुक्तांची प्रशासक म्हणून नेमणूक केली आहे. या सर्व प्रक्रियेसाठी 5 कोटी रुपयांची तरतूद केली आहे, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत दिली.
मुंबईत आझाद मैदानात असलेले क्रीडा भवन गेली 8 वर्षे बंद असून नवीन नियमावली तयार करून निवडणूक घ्यावी आणि ते पुन्हा सुरू करावे असे आदेश मुंबई महापालिकेला द्यावे, अशी मागणी शिवसेना आमदार सुनील शिंदे यांनी अधिवेशनाच्या सुरुवातीला विशेष उल्लेख सूचनेद्वारे आणि आज तारांकित प्रश्नावेळी केली. त्याला नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले. नगरविकासमंत्री म्हणाले, आझाद मैदानातील क्रीडा भवनाच्या कार्यकारिणीने 2014 साली गैरव्यवहार केल्याने ती बरखास्त करून हे भवन बंद करण्यात आले. 2015 साली त्यावर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली. 2016 साली हे भवन अंशतः खुले करण्यात आले. मात्र, त्यावर प्रशासक नेमण्यात आला असून दोषींवर कारवाई करण्यात आली आहे. या क्रीडा भवनाच्या कार्यकारिणीची तत्काळ निवडणूक घेण्यात येणार आहे, अशी माहिती शिंदे यांनी दिली.
खासगी जिमखान्यांमध्ये सदस्यत्व मिळावे
मुंबईत अनेक खासगी जिमखाने असून ते सरकारी जमिनीवर आहेत. मात्र, तिथे सदस्यत्वासाठी लाखो रुपये घेतले जातात. पण, आयएसआय अधिकाऱयांना सर्व्हिस मेंबरशिपच्या माध्यमातून अशा जिमखान्याचे कायमस्वरूपी मोफत सदस्यत्व मिळते. त्यामुळे सरकारी जागेवरील जिमखान्यांचे विधान परिषदेच्या सदस्यांना कायमस्वरूपी सदस्यत्व मिळावे यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी प्रसाद लाड यांच्यासह सभागृहाने नगरविकासमंत्र्यांना केली. यासाठी मुंबईतील जिमखान्यांचा आढावा घेऊन प्रयत्न करू तसेच शिवाजी पार्कच्या धर्तीवर पर्यायी जिमखाना उभारण्यासाठी प्रयत्न करू, अशी माहिती शिंदे यांनी दिली.
शिवाजी पार्क येथे महापौर निवास
क्रीडा भवनाच्या अखत्यारीतील शिवाजी पार्क येथील इमारत मोडकळीस आल्यामुळे तिचा वापर 2014 साली बंद करण्यात आला आहे. या इमारतीचा पुनर्विकास महापालिका करणार आहे. या जागेचे आरक्षण महानगरपालिका जिमखान्याऐवजी महानगरपालिका निवासस्थान असे बदलण्यात आले असून या जागेवर मुंबई महापौरांचे निवासस्थान होणार आहे, अशी माहिती शिंदे यांनी लेखी उत्तरात दिले.






















































