पुणे उपनगरातील गुन्हेगारीला लगाम; 65 सराईत हद्दपार, 7 टोळी प्रमुखांचा समावेश

>> गणेश राख, पुणे 

पुणे शहरातील कोंढवा, वानवडी, मुंढवा, हडपसर, लोणी काळभोर यासह उपनगरातील सराईत गुन्हेगारांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. परिमंडळ पाचमध्ये येणाऱ्या सात पोलीस ठाण्यातील 65 सराईत गुन्हेगारांना पुणे, पिंपरी चिंचवडसह जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. यामध्ये 7 टोळी प्रमुखांचा समावेश आहे. जानेवारी ते आजपर्यंत ही कारवाई करण्यात आली असून यामुळे उपनगरातील गुन्हेगारीला काही प्रमाणात का होईना, लगाम बसला आहे.

गेल्या काही दिवसात शहर परिसरात वाहनांची तोडफोड, जबरी चोऱ्या, घरफोड्या करणाऱ्या आरोपींनी धुमाकूळ घातला आहे. त्यातही उपनगराचा भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिमंडळ पाचमधील कोंढवा, मुंढवा, हडपसर, बिबवेवाडी, मार्केटयार्ड, वानवडी आणि नव्याने समाविष्ट झालेले लोणी काळभोर या भागात गुन्हेगारांचा उपद्रव मोठा आहे. शहरातील पोलीस ठाण्याची पाच झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक मोठे कार्यक्षेत्र आणि गुन्हेगारी घटनांचा भाग म्हणून परिमंडळ पाचकडे पाहिले जाते. शहरात काही महिन्यांपूर्वी कोयता गँगचा विषय राज्यभर गाजला. याची सुरवात ही हडपसरमधून झाली होती. राज्याचे तत्कालीन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत हा मुद्दा मांडल्याने त्याची चांगलीच चर्चा झाली. तसेच, या भागात अल्पवयीन गुन्हेगारांकडून वाहनांची तोडफोड, जबरी चोऱ्या, घरफोड्या आणि चोरीच्या घटनांचे प्रमाण मोठे आहे. अनेक गुन्ह्यात सातत्याने गुन्हे करणारे गुन्हेगार हे महिनोन्महिने पोलिसांना मिळून येत नाहीत. याच कालावधीत ते दुसरे गुन्हे करतात. या सर्व पार्श्वभूमीवर परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांनी काही महिन्यांपूर्वी अशा वॉन्टेड, फरारी आरोपींना पकडण्यासाठी स्वतंत्र पथक स्थापन केले होते. या पथकाच्या माध्यमातून आजवर 80 हून अधिक आरोपींना पकडुन जेलमध्ये टाकण्यात आले आहे. तर, जानेवारी 2023 ते आजवर परिमंडळ पाचमधील तब्बल 65 सराईत गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले आहे. यामधे 7 टोळी प्रमुखांचा समावेश आहे. शेकडो सराईत गुन्हेगारांना जेलमध्ये तसेच हद्दपार करण्यात आल्याने उपनगरातील या भागात शांतता प्रस्थापित होण्यास मदत झाली आहे. परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख, सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख, शाहूराजे साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कामगिरी केली आहे.

… सर्वाधिक गुन्हेगारीचा भाग
यंदा जानेवारी ते जुलेपर्यंत शहरात 46 खुनाच्या घटना घडल्या आहेत. यातील 20 खून एकट्या परिमंडळ पाचच्या हद्दीत घडले आहेत. तसेच, एकूण 328 घरफोड्या पैकी 112 घरफोड्या या परिमंडळ पाचमधील कोंढवा, मुंढवा, हडपसर, लोणी काळभोर या भागात घडलेल्या आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर परिमंडळ पाचककडून आता प्रतिबंधात्मक कारवाईवर भर देण्यात आला आहे.

परिमंडळ पाचच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या विविध पोलीस ठाण्यातील सराईत गुन्हेगारांच्या अभिलेखाचा अभ्यास करून 65 जणांना हद्दपार करण्यात आले आहे. यापुढेही ही कारवाई सुरू राहणार आहे.
– विक्रांत देशमुख, पोलीस उपायुक्त, परिमंडळ 5