जालन्यातील मंठा तालुक्याला पुन्हा अवकाळीने झोडपले, पिकांचे नुकसान; घर,शाळावरील पत्रे उडाले

जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील उस्वद, जयपूर, एरंडेश्वर, तळणी, देवठाणा परिसरात 12 एप्रिल रोजी सायंकाळच्या 5 वाजेच्या सुमारास वादळीवार्‍यासह अवकाळी पावसाने झोडपले. मंठा उस्वद रोडवरील झाडे उन्मळून पडली. तर जिल्हा परिषद केंद्रीय शाळेचे संपूर्ण पत्रे लोखंडी पोल उखडून पडली असून विजेचे पोल देखील पडले. विद्युत वाहिन्या तुटल्याने या भागातील विज पुरवठा रात्रभर बंद पडल्याने ग्रामस्थांना रात्र अंधारात काढावी लागली.

तालुक्यात पुन्हा मध्ये रात्री एक विजेच्या दरम्यान ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटात सर्व दुर अवकाळी पावसाने झोडपले. मात्र या मोठ्या अवकाळी पाऊस कोसळत असताना वादळी वारे असल्याने फळपिकांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला असल्याचे विडोळी येथील शेतकरी मोहनराव अवचार यांनी सांगितले. या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील शेतकर्‍यांचे शेतातील मोसंबी, लिंबू,आंबा, डाळिंब, टरबूज, द्राक्ष, काकडी, खरबूज, मिरची, वांगी, बाजरी, मका, आणि भाजीपाला आदी पिकांचे अगोदरच दुष्काळात होरपळत असलेल्या शेतकर्‍यांचे लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यातच चालू हंगामातील खरीप, रब्बी पिक विमा, दुष्काळी अनुदान,नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांचं अनुदान तालुक्यातील शेतकर्‍यांना आज पर्यंत ही मिळाले नसल्याने मिंधे सरकारच्या नावाने ओरडत आहेत. रस्त्यावर पडलेल्या झाडांमुळे या भागातील जनजीवन विस्कळीत झाले असल्याने उस्वद व परिसरातील नागरिकांनी पाच सहा तास श्रमदान करून रस्ता खुला केला. विशेष म्हणजे आज सकाळपर्यंत प्रशासनाकडून कसल्याही प्रकारची दखल घेतली नसल्याने ग्रामस्थांमध्ये सरकारबद्दल चिड निर्माण झाली आहे. तर उस्वद -मंठा – सेलू असा असल्याने रस्ता मोकळा होईपर्यंत या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.