मोनेगिरी – काय नाव असेल त्याचं?

>> संजय मोने

तो येत राहिला, भेटत राहिला. कायम तो कसल्या तरी घाईत असायचा. तो पोटापाण्यासाठी काय करतो याबद्दल सगळ्यांना वेगवेगळी माहिती होती. इंजिनीअर, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह, छपाईचा व्यवसाय, बिल्डर… सगळ्यांकडे त्याची त्या त्या व्यवसायासाठी छापून घेतलेली व्हिजिटिंग कार्डस् होती. प्रत्येक कार्डवर संपर्क करण्यासाठी जो नंबर होता तो कधीच उचलला जायचा नाही. तेव्हा तो महेंद्र होता… पण म्हणजे नेमका कोण असेल तो… काय नाव असेल त्याचं?

साधारण अडतीस वर्षांपूर्वीची गोष्ट. तेव्हा मी शैक्षणिक अज्ञान विकणारी पुस्तकं विकायला नागपूरला स्थायिक होतो. चारसहा महिने. तेव्हा नागपूरला आजची सूज आली नव्हती. आमची कामं संपवून सातच्या सुमारास पानाच्या दुकानाबाहेर सगळे जमायचो. तो एकमेव पानठेला होता, जो उशिरापर्यंत कार्यरत असायचा. कलाकार, अडत्ये, राजकारणी आमच्यासारखे फिरस्ते पोते करायला काहीही नाही म्हणून तिथे जमायचे. एके दिवशी तिथे एक माणूस एका गाडीतून उतरला. अंगावर उत्तम कपडे होते. त्याने आपलं नाव ‘महेंद्र’ असं सांगितलं. चहाचे पैसे द्यायची वेळ आली तेव्हा आमच्यापैकी कोणाकडेही सुटे पैसे नव्हते. नुकताच पगार झाला होता म्हणून अन्यथा साधारण महिन्याच्या अखेरीस फक्त सुटे पैसेच असायचे. त्याने सगळ्यांच्या चहाचे पैसे दिले. आपोआपच गप्पा सुरू झाल्या. तो कुठेतरी नोकरी किंवा व्यवसाय करत होता. छापखाना वगैरेमध्ये तो काहीतरी छापून आणायचा. त्याची दलाली वगैरे असं त्यानंच सांगितलं. “राहतोस कुठे?” असं विचारलं. त्याने पत्ता सांगितला. आम्हाला नागपूरला येऊन फार दिवस झाले नव्हते. त्यामुळे आम्ही सगळे तपशिलात शिरलो नाही. एका चहाच्या पैशात काय काय विचारणार? विषय तिथेच थांबला.

अधूनमधून तो यायचा. विचारलं तर कलकत्ता, बंगलोर, मद्रास, गोवा असं सांगायचा. एकदा आमच्यातल्या एकाने “गोव्याहून काजू आणशील का?” म्हणून पैसे दिले. त्यानंतर महेंद्र गायब होता. गायब होण्याएवढे पैसे नव्हते म्हणून आम्ही विसरून गेलो. अचानक तो आला आणि लिचीचा एक मोठ्ठा खोका त्याने उघडला. “गोव्याचं जाणं रद्द झालं. हिमाचल प्रदेशला गेलो होतो.” आम्हाला लिची हे फळ फक्त ऐकून आणि बघून माहीत होतं. विकत घ्यायला धीर व्हायचा नाही, इतकं तेव्हा महाग. फन्ना उडवला. मग तिथेच त्या दुकानाबाहेर त्याने आपल्या गाडीच्या डिकीतून अजून तीन खोके काढले. फुकट ते पौष्टिक या नात्याने आम्ही सगळ्यांनी ते संपवले.

तो येत राहिला, भेटत राहिला. एकदा त्याला “छपाई करून देतोस का?” असं विचारलं. त्यावर त्याने “तो धंदा मी बंद केला” असं सांगितलं. “सध्या एक ट्रव्हल एजन्सी चालवतो.” असं म्हणाला. काही काळाने आमचं अज्ञान पसरवण्याचं काम संपलं. मित्र पांगले.भेटू, फोन करू वगैरे वचनेही विसरली गेली. कोणी नोकरी पकडून त्याला निवृत्त होईपर्यंत चिकटून राहिला, कोणी स्वतचा व्यवसाय सुरू केला. त्यात कोणी तगले तर कोणी बुडाले. लग्नं झाली, कुटुंबं स्थापन झाली. मी सगळ्यात असुरक्षित व्यवसाय स्वीकारला. नाटक, मालिकांचा भस्मासुर जन्माला आला होता, पण त्याने बाळसं धरलं नव्हतं.
कधीकाळी जुने मित्र भेटायचेही. बरेच जण ‘पुणे तिथे काय उणे’ या नात्याने तिथे रहायला गेले. तिथे एखाद्या रेस्टॉरंट किंवा बारमध्ये भेट व्हायची, पण तिथे त्यांच्या ‘प्रगतीची यशोगाथा’ ऐकण्यात अर्धावेळ खर्च व्हायचा. तिथेही एक दिवस अचानक महेंद्र आला.कसा? कुठून? माहीत नाही. तो बोलायचा नाही अजिबात. फक्त ऐकत रहायचा. सगळा सोहळा संपवून (म्हणजे तबियतदार तज्ञांनी समजून घ्यावं) झाल्यावर बिल मागायची वेळ झाली की, काही जणांना सिगारेट ओढायला बाहेर जायची आठवण व्हायची. काही घरी फोन करायचा आहे म्हणून कटायचे. तेव्हा हा महेंद्र एकटय़ाने पैसे देऊन मोकळा व्हायचा.
कार्ड वगैरे अगदी नवनवीन आली होती. आमच्यापैकी कोणाकडेच ती नव्हती. एकदा असेच त्याने पैसे दिले. मी मोठा नाटकाचा दौरा करून आलो होतो. पैसे देण्याची ऊर्मी दाटून आली.
“महेंद्र! मी देतो ना थोडेसे पैसे!”
“नको! तुझ्यापेक्षा जास्त पैसे देणारे आहेत इथे!”
बिल भरून तो “आलोच” म्हणून निघून गेला. कायम तो कसल्या तरी घाईत असायचा. कुठेही आम्ही जमलो आणि रेस्टॉरंटमध्ये बसलो तर हा पाठमोरा बसायचा नाही. समोर काय चाललंय ते एकटक बघत बसायचा. मधूनच उठून फोन करायला गल्ल्यावर जायचा. तो पोटापाण्यासाठी काय करतो याबद्दल सगळ्यांना वेगवेगळी माहिती होती. इंजिनीअर, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह, छपाईचा व्यवसाय, बिल्डर इ.इ. एकाच्या मते तर तो अमली पदार्थ विकणारा होता. सगळ्यांकडे त्याची त्या-त्या व्यवसायासाठी छापून घेतलेली व्हिजिटिंग कार्डस् होती. प्रत्येक कार्डवर संपर्क करण्यासाठी जो नंबर होता तो कधीच उचलला जायचा नाही. त्याबद्दल विचारलं तर, “मी कामात होतो, तुझा फोन आलेला बघितला, पण पुन्हा फोन केला तर लागला नाही.”

एकदा रविवारी सकाळी आम्ही सगळे गप्पा मारत खात होतो. जागतिक दर्जाची मिसळ उडवून आणि वर मस्कापाव (कडक पाव) चेपून तिसरा चहा संपवला होता. तेवढय़ात आरडाओरडा ऐकू आला म्हणून बाहेर आलो. कोणीतरी चव्हाण, देशमुख किंवा डबल आडनाव असलेला पाटील त्याच्या वाहनाला पार्क करायला जागा नाही म्हणून एक स्कूटर धक्का देऊन बाजूला करत होता. तो स्कूटरवाला “दोन मिनिटांत गाडी बाजूला घेतो” म्हणत होता, पण वडिलांच्या जिवावर उडणाऱया राजपुत्राला त्याची काय तमा?
“आपली गाडी इथेच उभी राहते.”
“ठीक आहे! मान्य! पण आम्ही दोन मिनिटांत निघणार आहोत.जरा थांबा!”
“ए! आम्ही थांबत नसतो. जागा खाली करा!”
महेंद्र पुढे झाला आणि त्या मस्तवाल पोराच्या कानाखाली त्याने आवाज काढला. आवाज काढण्याएवढी तब्येत त्याच्याकडे नव्हती, पण आवेश जोरदार..
“ए! कोण तुझे अण्णा, अप्पा, दादा… त्यांना इथे बोलाव. च्यायला! पाच मिनिटांत फैसला करतो. ए… तुम्ही निघारे!”
आम्ही गपचूप निघालो. दुसऱया दिवशी सगळीकडे त्या पोराचा फोटो फिरत होता. रीतसर बापाची माफी मागणारी बातमी पण आली. आम्ही सगळे अवाक होऊन बघत राहिलो. त्यानंतर महेंद्र गायब झाला. दिल्लीला माझ्या एका नाटकाच्या प्रयोगासाठी गेलो होतो. तिथे हौस खास नावाच्या भागात फिरत असताना एका मोठय़ा गाडीत महेंद्र बसून चालला होता. मी त्याला हाक मारली तर त्याने मान फिरवली आणि गाडी निघून गेली. प्रयोगाच्या तिथे एक माणूस नंतर गुच्छ घेऊन आला. त्यावर ‘नागपूर प्रिंटर’ असं लिहिलेलं होतं.
एकदा गोव्याला मी गेलो होतो. विमानतळाच्या बाहेर उभा होतो. वाहनाची वाट बघत असताना अचानक एक मोठ्ठी कार समोर आली. ड्रायव्हरने उतरून दरवाजा उघडला.
“सर! मडगावात जाणार ना?”
पुढे त्याने मी जिथे राहणार होतो त्या हॉटेलचे नावही सांगितले.
“तुम्हाला कोणी सांगितलं?” मी विचारलं
त्यावर तो हसला आणि गाडी सुरू केली. प्रवासात फोन आले आणि विषय तिथेच संपला. महेंद्र काही भेटला नाही मला. बरं, हा प्रवास त्याने घडवून आणला असेल असं कधी वाटलंच नाही.
कोकणात माझ्या नात्यातल्या एकाच्या जमिनीची समस्या निर्माण झाली होती. कोणीतरी राजकारणी त्यात अडचण आणत होता. मी त्या गावी पोहोचलो. तिथे कोणी ताकास तूर लागू देत नव्हतं. का कुणास ठाऊक, पण माझ्याकडे असलेला महेंद्रचा फोन फिरवला. उचलला गेला नाही. आता पुढे काय करायचं? त्याच गावात रात्री माझा प्रयोग होता. संपल्यावर अचानक महेंद्र तिथे आला. मी चकित झालो.
“तुझं जमिनीचं काम उद्या होईल.”
“तुला काय माहीत?.. आणि महेंद्र, तू नेमका कोण आहेस?” मी विचारलं.
“पहिली गोष्ट, माझं नाव महेंद्र नाही. काय आहे ते विचारू नकोस. मी काय करतो ते आत्ता सांगतो. मी आयबीचा माणूस होतो. काल निवृत्त झालो. त्याच्या आधी तुझं काम केलं. आता मस्त जेवू या. मी यापुढे इथेच राहणार. हे माझं मूळ गाव. बायको, मुलगी इथलीच. मुलगी ऑस्ट्रेलियाला असते.”
“पण मग आम्हाला भेटायचास ते?”
“तेव्हा मी भारत सरकारच्या कामावर असायचो. ते सोड. मस्त रात्र घालवू या. उद्या सकाळी गोव्यावरून तुझं विमानाचं तिकीट काढून ठेवलेलं आहे.”
“पण तुझं नेमकं नाव काय?”
“जाऊ दे. या भागात आलास तर मला कळेल. शेवटी एक गोष्ट सांगतो. मी फक्त तुलाच भेटलो. कारण माहीत आहे? कारण तू मला कधीच उगाच प्रश्न विचारले नाहीस.”
रात्रभर गप्पा झाल्या. सकाळी एक कार आली. मी मुंबईला परत आलो. तेव्हा तो महेंद्र… म्हणजे जो कोण असेल तो… शेवटचा भेटला. खरंच काय नाव असेल त्याचं?

[email protected]