
तामीळनाडूतील भाजपचे नेते के अण्णामलाई यांनी मुंबईत प्रचारादरम्यान ‘बॉम्बे इज नॉट महाराष्ट्र सिटी’ असे वादग्रस्त विधान केलं. या वक्तव्यावरून सध्या त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. या दरम्यान महाराष्ट्र एकिकरण समितीने अण्णामलाई यांच्या तोंडाला काळे फासणार असल्याचा इशारा दिला आहे. समितीने ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत हा इशारा दिला आहे.
”भाजपचे अण्णामलाई जिथे दिसतील तिथे मराठी एकीकरण समिती त्याच्या तोंडाला काळे फासणार. महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्र द्रोह करायचा नाही हे लक्षात घे. महाराष्ट्रचा अवमान सहन केला जाणार नाही. अन्नमलाईच्या ७०० पिढ्या आल्या तरी मुंबई ही महाराष्ट्राची राहील आणि मुंबईचे नाव मुंबई असे आदराने घ्यावे. असे लेचेपेच खूप आले आणि गेले. महाराष्ट्राच्या हुतात्म्यांचा आणि मराठी माणसाचा अवमान केलाय, कान पकडून तातडीने महाराष्ट्राची माफी मागावी. भाजपच्या लोकांनी मुंबई ही महाराष्ट्राचीच आहे हे कपाळावर कोरून घ्यावे”, असे या पोस्ट मध्ये म्हटले आहे.
तसेच मुंबई पोलिसांनी अण्णामलाई यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणीही या पोस्टमधून करण्यात आली आहे. ”निवडणुकीच्या काळात असे चिथावणीखोर वक्तव्य करून स्थानिकांच्या भावना भडकावून, प्रांतिक /भाषिक वाद वाढविणारे हे परराज्यातुन लोक येऊन राज्याची शांतता भांग करू पाहत आहेत, दंगे करू पाहत आहेत. यांच्यावर तत्काळ गुन्हा नोंदवावा”, अशी मागणी समितीकडून करण्यात आली आहे.





























































