
आयसीसी टी-20 वर्ल्डकपमध्ये रविवारी हिंदुस्थान-पाकिस्तान सामना पार पडला. एकतर्फी झालेल्या सामन्यात हिंदुस्थानने पाकिस्तानचा धुव्वा उडवला. या सामन्यानंतर हिंदुस्थानचा माजी खेळाडू मोहम्मद कैफ याने बाबर आझम याच्यावर जोरदार टीका केली. बाबर आझमची तुलना विराट कोहलीशी करणे चुकीचे आहे. बाबर विराटच्या जवळपासही पोहोचू शकत नाही. कोहली म्हणजे हिमालय, तर बाबर आझम छोटी टेकडी, असे कैफ म्हणाला.
हिंदुस्थानविरुद्धच्या लढतीत बाबर आझम याने 7 चेंडूंचा सामना करत केवळ 5 धावा केल्या. हा सामना संपल्यानंतर आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना कैफने 2022 ला मेलबर्नमध्ये विराट कोहलीने खेळलेल्या ऐतिहासिक 82 धावांच्या खेळीचा दाखला दिला. मेलबर्नमधील त्या खेळीचा विचार करा, जिथे शेवटच्या 8 चेंडूत 28 धावांची गरज होती. बाबर आझमला अशा परिस्थितीत 8 चेंडूत 16 धावा करणेही कठीण जाईल. हाच दोघांमधील फरक आहे.
कैफ पुढे म्हणाला की, खेळाडूची महानता केवळ त्याने केलेल्या एकूण धावांवरून ठरत नाही, तर त्याने दबावाखाली खेळलेल्या डावांवरून ठरते. तुम्ही किती वेळा ‘प्लेअर ऑफ द मॅच’ ठरलात? जेव्हा संघ संकटात होता, तेव्हा तुम्ही किती मॅच-विनिंग खेळी खेळल्या? तुमच्या फलंदाजीमुळे संघाने एखादी ट्रॉफी जिंकली का? असा सवालही कैफने केला. विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्ध सातत्याने अशक्य वाटणारे विजय मिळवून दिले आहेत, जे बाबरला अद्याप जमलेले नाही, असेही कैफ म्हणाला.
सुपर एटचे सामने ठरल्याप्रमाणेच; क्रमवारी लाभलेले संघच सुपर एटमध्ये, फक्त ‘ब’ गटाचा फैसला आज लागणार
2021 च्या टी-20 विश्वचषकात बाबरने हिंदुस्थानविरुद्ध केलेल्या 68 धावांच्या खेळीचा उल्लेख करताना कैफ म्हणाला की, तो विजय दवाच्या प्रभावामुळे सोपा झाला होता. त्यानंतर बाबरला हिंदुस्थानविरुद्ध एकही संस्मरणीय खेळी खेळता आलेली नाही. त्याने हिंदुस्थानविरुद्ध 6 टी-20 सामने खेळले असून 22 च्या सरासरीने त्याने केवळ 110 धावा केल्या आहेत.
आता हे युद्ध राहिले नाही, सौरभ गांगुलीची पाकिस्तानी संघावर टीका



























































