कौशल्य विकास विभागातील बढती घोटाळ्याची चौकशी होणार

कौशल्य विकास व रोजगार विभागात झालेल्या बढत्यांमध्ये झालेल्या घोटाळय़ाची चौकशी करण्यात येणार आहे. याप्रकरणी कौशल्य विकास आयुक्तांना चौकशी करून माहिती देण्याच्या सूचना देण्यात येतील असे कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.

कौशल्य विकास आयुक्तालयामार्फत 6 जुलै 2025 रोजी विभागातील वरिष्ठ लिपिकांना कनिष्ठ रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी या पदावर नियमबाह्य बढत्या देण्यात आल्याचे वृत्त दैनिक ‘सामना’ने प्रसिद्ध केले होते. या बढत्या करताना शासकीय नियम डावलले गेले. वर्षानुवर्षे एकाच विभागात ठाण मांडून असलेल्या अधिकाऱयांचा विभागही बदलला गेला नाही. 43 अपात्र अधिकाऱयांची बढती करताना आर्थिक देवाणघेवाण झाल्याचा संशय व्यक्त करत घोटाळय़ाला जबाबदार असलेल्या कौशल्य विकास आयुक्त, उपायुक्तांचे निलंबन करावे, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली होती.