
- आम्ही उद्योगिनी
महिला उद्योगिनींच्या कार्याची दखल घेणारा व त्यांना मार्गदर्शन करणारा हा अंक निर्यात विशेषांक म्हणून प्रकाशित झाला आहे. या अंकात सातासमुद्रापार आपल्या उद्योगाचा ठसा उमटविणाऱ्या उद्योगिनींची माहिती देणारे लेख आहेत. तसेच शासकीय योजनांचा लाभ घेऊन उद्योग वाढविणाऱ्या उद्योगिनींचे मनोगत आणि निर्यातीसाठी मार्गदर्शन करणारा अरुण हर्डीकर यांचा लेखाचा समावेश अंकात आहे. याशिवाय बचत गटातून महिला विकास, परदेशी व्यापार शेतकऱ्याची समृद्धी, थेट परदेशातून पेयांची मागणी, इंडिया डे कार्निवल, इचलकरंजीतून थेट युरोप अशा अनेक लेखांतून महिलांना प्रेरणा व मार्गदर्शन मिळेल.
संपादिका : मीनल मोहाडीकर
मूल्य : 80 रु., पृष्ठs : 56

- भवताल
महाराष्ट्रातील परंपरागत जलव्यवस्थांचा मागोवा घेणारा हा विशेषांक आहे. या अंकात महाराष्ट्रातील साडेचार हजार वर्षांपूर्वीच्या पहिल्या कालव्यापासून आजपर्यंतच्या जलव्यवस्थांचा आढावा घेणारे वरदा खळेदकर, डॉ. अरुणचंद्र पाठक, मुक्ता कुलकर्णी, इरावती बारसोडे यांचे लेख माहितीपूर्ण आहेत. याशिवाय महाराष्ट्रातील परंपरागत जलव्यवस्थापनाच्या काही पद्धती अर्थात फड (मुकुंद धारशिवकर), किल्ल्यांवरची टाकी (अभिनव कुरकुटे), लेण्यांतील टाकी (सूरज पंडित), बोडी (मंदार मोराणे) या संबंधित विषयांचा आढावा घेणारे लेख वाचनीय. प्राचीन काळापासून ब्रिटिश काळापर्यंत जलनियोजन आणि त्या निर्मितीतील मलिक अंबर, अहिल्यादेवी होळकर, शाहू महाराज, एम. विश्वेश्वरय्या आदी ऐतिहासिक व्यक्तींच्या योगदानाबद्दल विस्तृत माहिती देणारे लेख उत्तम आहेत. याव्यतिरिक्त ऐतिहासिक जलव्यवस्थांचा मागोवा घेणारे तसेच इतिहासात पाणीपुरवठय़ाची काही वैशिष्टय़पूर्ण व्यवस्था या विषयांचा धांडोळा घेणारे मान्यवरांचे दर्जेदार लेख वाचकांना नक्कीच आवडतील. विहिरी, तलाव अशा पारंपरिक जलसाठय़ांची आजची दुरवस्था व काही ठिकाणी त्यांच्या होणाऱ्या पुनरुज्जीवनाबद्दलचे केलेले तज्ञांचे लेखन या विषयाचे गांभीर्य जाणवून देणारे आहेत. प्रभाकर भोसले यांचे अंकाच्या विषयाशी संबंधित छायाचित्र लक्षवेधी. सुबक बांधणी व ज्वलंत विषयांशी संबंधित माहिती असा सर्वांगाने परिपूर्ण असलेला अंक संग्रही ठेवावा असा!
संपादक : अभिजित घोरपडे
मूल्य : 200 रु., पृष्ठs : 152
- स्वप्ना
39 वर्षांची प्रदीर्घ वाटचाल करणारा हा दिवाळी अंक यंदा आयुर्वेद विशेषांक म्हणून प्रसिद्ध झाला आहे. त्या अनुषंगाने आयुर्वेदावरील ज्यांचे महत्त्वाचे योगदान आहे अशा व्यक्तिमत्त्वांची ओळख करून देणारे लेख तसेच आयुर्वेदातील सोप्या उपायांचे माहितीपूर्ण लेख या अंकात दिले आहेत. काही उपचार पद्धतींची ओळख (अरविंद केतकर), कलिंगड, कारल्याचे गुण, उपवासाचे महत्त्व, कर्करोगावर टोमॅटोचा परिणाम, पौगंडावस्थेतील आहाराच्या गरजा, फणस खाण्याचे फायदे, दूर्वा, आघाडा वनस्पतींचे औषधी उपयोग, सायटिका आणि आयुर्वेद, शहाळय़ाचे आरोग्यदायी फायदे, प्राणिक हिलिंग उपचार पद्धती, आरोग्यदायी बदाम, आळीवाचे औषधी उपयोग, घृतमाहात्म्य, गुडघेदुखीवर आयुर्वेदिक उपाय, होमिओपॅथिक उपचार पद्धती असे अनेक माहितीपूर्ण लेख या अंकात आहेत. जोडीला वार्षिक राशीभविष्यही आहे.
संपादक : वि. द. बर्वे
मूल्य : 120 रु., पृष्ठs : 280

- आपले छंद
दरवर्षी नावीन्यपूर्ण साहित्यकृती घेऊन येणारा यंदाचा अंकही अभिरुची जोपासणारा आहे. कथा, लेख, चित्रे, व्यंगचित्रे, पंच महाभूते आणि साहित्यिक यांचे नाते जोडलेले पाहण्याचा योगही यंदाच्या अंकाची वैशिष्टय़े आहेत. महाभारतकार व्यासमुनीपासून ही साहित्य दिंडी सुरू होते. मग ज्येष्ठ, सर्वकालीन महान लेखक कविकुलगुरू कालिदास, नोबेल पारितोषिक विजेत्यांवरील लेखकांचे साहित्यही आपले अनुभवविश्व समृद्ध करत जाते. विविध भाषांमधील प्रतिभावंत कवींच्या कवितांचा एकत्रित संग्रह ही तर या अंकाची मेजवानी ठरते. लक्षवेधी व्यंगचित्रांबरोबरच मेटालिक बुकमार्क हे या संग्राह्य अंकाचे वेगळेपण आहे. या जोडीला उत्तम छपाई, वेधक मांडणी यामुळे अंक संग्राह्य ठरला आहे.
संपादक : दिनकर शिलेदार
पृष्ठे : 228, मूल्य : 300 रु.
- साहित्य चपराक
वैविध्यपूर्ण विषयांवरील दर्जेदार साहित्याने नटलेला हा अंक वेगवेगळ्या विषयांवर माहिती देणारा आहे. बहुरंगी छपाई असलेला हा अंक 402 पानांचा असून या अंकात 74 कविता, 10 कथांबरोबरच माहितीपूर्ण लेखांची मेजवानी नक्कीच वाचकप्रिय ठरेल. चतुरस्त्र्ा, परखड, रास्त आणि कर्तव्यदक्षता हे या अंकाचे वैशिष्टय़े आहे. व्यंकटेश माडगूळकर यांची ‘कथा Š एक दृष्टिक्षेप’ ही श्रीराम ग. पचिंद्रे यांनी सांगितलेली कथा वाचनीय आहे. सुधीर गाडगीळ, डॉ. सच्चिदानंद शेवडे आणि भारत देसडला आदी मान्यवरांचे लेख वाचनीय आहेत.
संपादक : घनश्याम पाटील
पृष्ठs : 402, मूल्य : 250 रु.

- ‘साद’ ई दिवाळी अंक
‘साद’ हा दिवाळी अंक यंदा ई माध्यमात प्रकाशित आणि तोही मल्टी मीडिया स्वरूपात हा अंक आपण प्रसिद्ध करीत आहोत. नेहमीच्या पठडीपेक्षा या वर्षाला आपण विषयीदेखील वेगळा हलका फुलका आणि खुसखुशीत घेतला आहे. विनोद हा विषय घेऊन आपण यंदा दिवाळी साजरी करीत आहोत. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यापासून ते मंगला गोडबोले यांच्यापर्यंत मराठी विनोदाच्या परंपरेतील विनोद आपणास या अंकात अनुभवण्यास मिळणार आहेत. विनोदाचे अठ्ठावीस प्रकार, त्यातील उपप्रकार यात आहेत. नावीन्यपूर्ण खिडकी चित्रे, आकर्षक सजावट उत्कृष्ट.
संपादक : गुरुदत्त लाड
- साहित्य आभा
विशिष्ट विषयाच्या अनुषंगाने अभ्यासपूर्ण लेख वाचकांना उपलब्ध करून देणे हे या अंकाचे वैशिष्टय़ आहे. यंदा डाळी-कडधान्यांविषयी माहितीपूर्ण लेख या अंकात आहेतच. सोबत कथा, राजकीय, सामाजिक लेखांचाही समावेश अंकात आहे. समाजातील उपेक्षित मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणाऱ्या ‘मुस्कान’ शाळेबद्दलचा रेणू दांडेकर यांचा माहितीपूर्ण लेख ‘मेघदूता’तील सौंदर्यस्थळांची ओळख करून देणारा लेख मस्त जमून आलेत. याव्यतिरिक्त लावणीसम्राज्ञी (डॉ. विजया वाड), आणीबाणीच्या आठवणी (दत्तात्रेय गोखले), लज्जा कादंबरीची पंचवीशी (अभय गोखले), बदलती भाषा (संकेत सातोपे), माओवाद आदिवासींसाठी की राजकीय सत्तेसाठी (स्मिता गायकवाड) या लेखांचा समावेश आहे.
संपादिका : शारदा धुळप
मूल्य : 200/-, पृष्ठs : 152

























































