दिवाळी बोनस कमी दिला, टोल कर्मचाऱ्यांनी हजारो वाहनांना टोल न देता जाऊ दिले; 30 लाखांचे नुकसान

दिवाळीत बऱ्याचशा कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना बोनस देतात. काही कंपन्या भरभरून बोनस देत असल्याने त्यांच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी खऱ्या अर्थाने जोरदार साजरी होते. मात्र उत्तर प्रदेशमध्ये एका कंपनीने कर्मचाऱ्यांना कमी बोनस दिल्याने त्या कंपनीला थेट 30 लाखांचा फटका बसला आहे.

उत्तर प्रदेशातील फतेहाबादमधील आग्रा-लखनऊ एक्सप्रेसवेवरील एका टोल प्लाझावरील कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस कमी दिल्याने त्यांनी अनोख्यारित्या त्याचा निषेध केला. त्यांनी टोल नाक्याचे सर्व गेट गाड्यांसाठी खुले केले. त्यामुळे त्यामुळे ऐन दिवाळीत हजारो वाहने टोल टॅक्स न भरताच निघून गेली. या सर्वप्रकारामुळे टोल कंपनीचे 30 लाखाचे नुकसान झाले आहे. तब्बल दोन तास टोल वसुली थांबली होती.

यंदा फक्त 1100 रुपये बोनस
गेल्या वर्षी या कंपनीने कर्मचाऱ्यांना पाच हजार रुपये बोनस दिला होता. तर यंदा कंपनीने त्येक कर्मचाऱ्याला 1100 रुपये बोनस दिला. त्यामुळे कर्मचारी संतापले. त्यांनी कंपनीकडे वाढिव बोनस मागितला मात्र कंपनीने नकार दिल्याने कर्मचाऱ्यांनी थेट काम बंद आंदोलन करत टोल प्लाझाचे सर्व गेट खुले केले. त्यामुळे दोन तासात पाच हजारांपेक्षा जास्त वाहने टोल न भरताच पुढे निघून गेली.