
नेपाळपाठोपाठ फ्रान्समध्येही आज असंतोष आणि आंदोलनाचा भडका उडाला. फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या विरोधात हजारोंच्या संख्येने जनता रस्त्यावर उतरली. ‘ब्लॉक एवरीथिंग’ अशी हाक देत मास्कधारी आंदोलकांनी राजधानी पॅरिससह विविध शहरांत तुफान दगडफेक, तोडफोड व जाळपोळ केली. मॅक्रॉन यांची सत्ता उलथवल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही, असा निर्धार आंदोलकांनी केल्याने फ्रान्स पुन्हा क्रांतीच्या उंबरठय़ावर आहे.
फ्रान्सच्या सत्तेवर सध्या इमॅन्युएल मॅक्रॉन यांची पकड आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली काही महिन्यांपूर्वी सत्तेवर आलेले फ्रँको बायरू यांनी राष्ट्रीय खर्चात 3.7 लाख कोटींची कपात करण्याची योजना आणली होती. त्यात दोन सार्वजनिक सुट्टय़ा रद्द करण्याबरोबरच पेन्शनमध्ये कपात करण्याचा प्रस्ताव होता. त्याला लोकांचा तीव्र विरोध होता. या विरोधाची धग संसदेपर्यंत पोहोचली आणि संसदेत बायरू यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आला. हा प्रस्ताव मंजूर झाला आणि बायरू यांना पद सोडावे लागले.
बायरू पायउतार होताच मॅक्रॉन यांनी आपले विश्वासू माजी संरक्षणमंत्री सेबॅस्टियन लेकोर्नू यांची पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली. त्यामुळे सरकार विरोधातील रोष आणखी वाढला. त्यामुळे मोठय़ा संख्येने तरुण रस्त्यावर उतरले.
मत देऊन फायदा काय?
‘मॅक्रॉन यांच्या नेतृत्वाखालील लागोपाठच्या सरकारांना आम्ही विटलो आहोत. त्यांच्या नेतृत्वाखाली देशात काहीच बदलणार नाही. त्यामुळे हे सरकार आम्हाला नको आहे. आम्ही आतापर्यंत न्यायालयात अनेक याचिका केल्या, पण कोणीही आमचे ऐकत नाही. आता आंदोलन हाच मार्ग आहे. पूर्ण सत्तांतर होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे, असे आंदोलकांनी स्पष्ट केले.