शिक्षणाच्या आयचा घो… दहावीची परीक्षा कठीणच!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
ssc-exam
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । मुंबई

भाषा विषयाच्या कृतिपत्रिकेमुळे दहावीची परीक्षा सोपी होण्याऐवजी कठीणच बनली आहे. कृतिपत्रिकेत विचारलेल्या धडय़ाबाहेरील प्रश्नांमुळे विद्यार्थ्यांना ‘परीक्षावेळेचे गणित’ अद्यापि सोडविता आलेले नाही. कृतिपत्रिकेत उपयोजित प्रश्नातील बातमी लेखन, सारांश लेखन, निबंध आणि कथालेखन तसेच कवितेचे रसविचार लिहिताना विद्यार्थ्यांचा बराच वेळ निघूत जात असून तीन तासांत कृतिपत्रिका सोडविण्याचे कठीण आव्हान दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्चमध्ये होणाऱया बोर्डाच्या परीक्षेत पेलावे लागणार आहे.

नुकत्याच शाळेत पार पडलेल्या प्रथमसत्र परीक्षेत दहावीचे अनेक विद्यार्थी काठावर पास झाले आहेत. तीन तासांत विद्यार्थ्यांचा पेपर पूर्ण होत नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. हंसराज मोरारजी स्कूलचे शिक्षक उदय नरे यांनी सांगितले, मुंबईतील बहुसंख्य शिक्षकांनी कृतिपत्रिका सोडविण्यासाठी विद्यार्थ्यांना वेळ पुरत नसल्याचे निरीक्षण नोंदविले आहे. जे विद्यार्थी अभ्यासात हुशार आहेत, ज्यांचे अतिरिक्त वाचन आहे त्यांना कृतिपत्रिका सोडविण्यास फारसा त्रास जाणवत नाही, पण भाषेवर प्रभुत्व नसणाऱया शब्दांची जाण नसलेल्या तसेच वाचन न करणाऱया विद्यार्थ्यांचा परीक्षेतील बराचसा वेळ विचार करण्यातच जात आहे.

दहावीच्या सर्व माध्यमांतील भाषा विषयांना कृतिपत्रिका सोडवायची आहे.

ही 100 गुणांची कृतिपत्रिका असून त्यासाठी परीक्षा कालावधी तीन तास ठेवण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांना कृतिपत्रिका म्हणजे प्रश्नपत्रिकेत उत्तरे लिहायची आहे. वेगळी उत्तरपत्रिका असणार नाही.

भाषेमुळे निकालावर परिणाम?

यंदा भाषा विषयामुळे दहावीच्या निकालावर परिणाम होऊ शकतो, असे कुलाबा महापालिका माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक अंबरसिंग मगर यांनी सांगितले. नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांना अद्यापि कृतिपत्रिकेचे आकलनच झालेले नाही. जे विद्यार्थी सामान्य आहेत त्यांची तीन तासांत कृतिपत्रिका सोडवून पूर्ण होत नाही, असा अनुभव प्रथमसत्र परीक्षेत आला आहे. प्रिलियम परीक्षेत या विद्यार्थ्यांमध्ये कितपत सुधारणा झाली हे समजेल.

तोंडी परीक्षेचे 20 गुणही नाहीत

विद्यार्थ्यांना तीन तासांत 100 गुणांची कृतिपत्रिका सोडवायची आहे. पूर्वीचा 80ः20 पॅटर्न म्हणजेच तोंडी परीक्षेचे हक्काचे 20 गुण यंदा नसणार आहेत. त्यामुळे कृतिपत्रिकेत विद्यार्थ्यांना किती गुण पडतील हे पाहणे यंदा उत्सुकतेचे ठरणार आहे.