कॅनडा हादरलं! हायस्कूलमध्ये घुसून अंदाधुंद गोळीबार; महिला हल्लेखोरासह 10 जणांचा मृत्यू, 25 हून अधिक जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील टंबलर रिज येथील एका शाळेत अंदाधुंद गोळीबार झाला आहे. या गोळीबारात 9 जणांचा मृत्यू झाला असून 25 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. या हल्ल्यातील मुख्य संशयित हल्लेखोर महिलेने स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

स्थानिक वेळेनुसार मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. हल्लेखोराने केलेल्या अंदाधुंद गोळीबारमध्ये 9 जणांचा मृत्यू झाला. यापैकी 6 जण शाळेच्या आत मृतावस्थेत आढळले, तर शाळेच्या परिसरात असणाऱ्या एका घरात दोघांचे मृतदेह सापडले. एकाचा मृत्यू रुग्णालयात नेताना झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली. तसेच या दोन्ही घटनांचा एकमेकांशी संबंध असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. या हल्ल्यात 25 जण जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना एअरलिफ्ट करून रुग्णालयात नेण्यात आले.

पोलिसांनी एका महिला संशयिताचा उल्लेख केला होता. महिलेचे केस तपकिरी रंगाचे होते आणि तिने पँट-शर्ट घातली होती. अंदाधुंद गोळीबारानंतर पोलिसांना संशयिताचा मृतदेह सापडला असून, या घटनेत दुसरा कोणी सामील होता का, याचा तपास सुरू आहे.

दरम्यान, गोळीबाराची माहिती मिळताच रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. तत्पूर्वी नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आणि सुरक्षित स्थळी राहण्याचे ‘इमर्जन्सी अलर्ट’ मोबाईलवर पाठवण्यात आले होते. तसेच स्थानिक आरोग्य केंद्रात कोड ऑरेंज लागू करण्यात आला असून, तिथे केवळ आपत्कालीन रुग्णांनाच प्रवेश दिला जात आहे. गोळीबाराच्या या प्रकरणावर पंतप्रधान मार्क कार्नी यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

मार्क कार्नी यांनी एक्सवर पोस्ट करत या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. टंबलर रिजमधील या भयानक घटनेने मी हादरलो आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत, त्यांच्याप्रती माझ्या संवेदना आहेत. या कठीण काळात संपूर्ण कॅनडा ब्रिटीश कोलंबियाच्या नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असे मार्क कार्नी म्हणाले. तसेच याबाबत स्थानिक प्रशासकीय अधिकारी आणि सार्वजनिक सुरक्षा मंत्री गॅरी आनंदासंगेरी यांच्याशी चर्चा केली असून सरकारकडून सर्वतोपरी मदत पुरवली जात आहे, असेही तके म्हणाले.