
लंडनमध्ये नोकरी मिळवून देण्यासाठी व्हिसा काढून देतो व घर घेण्यासाठी मदत करतो, असे सांगून राहात्यातील दोनजणांची दहा लाख 11 हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी हरियाणातील दाम्पत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भूषण कुमार अग्रवाल व रितू अग्रवाल (दोघे रा. सोनीपत, हरियाणा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. बाळासाहेब हरकू गमे यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे.
बाळासाहेब गमे हे जस्ट डायल या ऍपशी संलग्न असून, ही कंपनी हॉटेल बुकिंग, प्लॉटिंग व इतर खरेदी-विक्रीचे व्यवहार मध्यस्थी म्हणून काम करते. कोरोना काळात राज्य शासनाने हॉटेल तत्काळ रिकामे करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे शिर्डी येथील हॉटेल पुष्पकमध्ये ग्राहक म्हणून आलेले भूषणकुमार अग्रवाल व रितू अग्रवाल यांच्याशी संपर्क साधून पर्यायी व्यवस्था करण्याची विनंती केली. त्यामुळे गमे यांनी राहाता येथील शिवमुद्रा टॉवरमधील बाळासाहेब बन्सी गमे यांचा फ्लॅट भाडेतत्त्वावर घेऊन दिला. यातून गमे यांचा भाचा स्वप्नील अनिल मोरे याचाही त्यांच्याशी परिचय झाला. त्यांनी त्याला काय काम करतो, असे विचारले असता, हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स झाला असल्याचे स्वप्नीलने त्यांना सांगितले. त्यावर आमचे नातेवाईक लंडनमध्ये आहेत. आम्ही तुला तिथे नोकरी मिळवून देऊ शकतो, परंतु तुला वर्क परमिटसाठी 5 लाख 38 हजार रुपये द्यावे लागतील, असे त्यांनी स्वप्नीलला सांगितले.
त्यानुसार स्वप्नीलने 24 ऑक्टोबर रोजी अग्रवाल दाम्पत्याला 2 लाख 18 हजार रुपये दिले. डिसेंबरमध्ये लंडनमध्ये जाण्यासाठी व्हिसा व नोकरीचे लेटर मिळून जाईल, असे त्यांनी सांगितले. 10 डिसेंबर रोजी मुंबई येथे प्लॉटिंग संदर्भात काम असून, आम्ही 15 डिसेंबरपर्यंत मुंबई येथे जाऊन येतो, असे सांगून ते मुंबईला गेले. त्यानंतर गमे यांनी त्यांच्याशी संपर्क केला असता, त्यांचे मोबाईल बंद आले. त्यानंतर 15 डिसेंबर रोजी शिवमुद्रा अपार्टमेंटमधील फ्लॅटची दुसरी चावी घेऊन फ्लॅट उघडून पाहिला असता, अग्रवाल दाम्पत्याने घरातील सर्व सामान गायब केलेले असल्याचे दिसले. या दोघांनी अजून कुणाकुणाची फसवणूक केली, याची चौकशी केली असता, त्यांच्याकडे काम करणाऱ्या रंजना निकाळे यांनाही घर घेऊन देतो, असे सांगून त्यांची 7 लाख 50 हजारांची फसवणूक केल्याचे समजले. त्यामुळे गमे यांनी दिलेल्या तक्रारीवरून राहाता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.



























































