अमेरिकेकडून व्हेनेझुएलाची लूट? 1000 किलो सोने अमेरिकेला पाठवणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांना सत्तेवरून हटवल्यानंतर काही आठवड्यांनंतर दोन्ही देशांमध्ये १००० किलो सोन्याचा एक मोठा करार झाला आहे. कथित ड्रग्ज प्रकरणात निकोलस मादुरोच्या अटकेनंतर व्हेनेझुएलातील सत्तेत मोठा बदल झाला आहे. या बदलामुळे अमेरिकेला व्हेनेझुएलाच्या तेल साठ्यावर थेट नियंत्रण मिळवता आले.

आता एक मोठा सोने निर्यात करार झाला आहे. अ‍ॅक्सिओसच्या अहवालानुसार व्हेनेझुएलाची सरकारी मालकीची खाण कंपनी, मिनरव्हेन आणि कमोडिटी ट्रेडिंग कंपनी ट्रॅफिगुरा यांच्यात एक महत्त्वाचा करार झाला आहे. या करारानुसार तब्बल १,००० किलोग्रॅमचे सोन्याचे डोअर बार अमेरिकन बाजारात पाठवले जातील. अहवालानुसार, या सोन्याची शुद्धता ९८ टक्के असेल. ट्रॅफिगुरा हे सोने अमेरिकन सरकारसोबत वेगळ्या व्यवस्थेअंतर्गत बाजारात पोहोचवेल.

मादुरोच्या सत्तेवरून हकालपट्टीनंतर अमेरिका-व्हेनेझुएला व्यापार संबंध वेगाने मजबूत होत आहेत. ४ मार्च २०२६ रोजी व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक अध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज आणि अमेरिकेच्या गृहसचिव डग बर्गम यांच्यात कराकसमधील मिराफ्लोरेस अध्यक्षीय राजवाड्यात एक महत्त्वाची बैठक झाली. बैठकीचा मुख्य अजेंडा खाण सुधारणा आणि खनिज उत्खनन यावर चर्चा करणे हा होता.

अमेरिकेने व्हेनेझुएलाच्या सर्वात मौल्यवान संसाधनावर नियंत्रण स्थापित केल्यापासून ट्रम्प प्रशासनाने स्वाक्षरी केलेला हा तिसरा उत्खनन करार आहे. ट्रॅफिगुरा अमेरिका आणि व्हेनेझुएला दरम्यान १ अब्ज डॉलर्सच्या तेल करारांमध्ये सक्रियपणे सहभागी आहे. या नवीन भागीदारीबद्दल ट्रम्प उत्साहित आहेत, त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, ट्रुथ सोशलवर डेल्सी रॉड्रिग्जच्या कामाचे कौतुक केले. त्यांनी स्पष्ट केले की तेल पुरवठा सुरळीतपणे सुरू झाला आहे आणि दोन्ही देशांमधील हे वाढत असलेले व्यावसायिक सहकार्य एक उत्तम पाऊल आहे.

या आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील वाढत्या तणावाचा सुरक्षित आश्रयस्थान मानल्या जाणाऱ्या सोन्यावर थेट परिणाम झाला आहे. जागतिक बाजारात स्पॉट गोल्ड ०.८% वाढून प्रति औंस $५,१७७.३३ वर पोहोचला. दरम्यान, एप्रिल डिलिव्हरीसाठी अमेरिकन सोन्याच्या वायदा किंमतीतही १% वाढ झाली. हिंदुस्थानी वायदे बाजारात, गुरुवारी एमसीएक्सवर २४ कॅरेट सोन्याची किंमत ०.६% वाढून प्रति १० ग्रॅम १६२,५४२ या विक्रमी उच्चांकावर पोहोचली. चांदीहीनेही १.८६% वाढून प्रति किलोग्रॅम २७०,५०१ वर पोहोचली. डॉलरमध्ये अलिकडेच घसरण (सुमारे ०.४%) आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळेही सोन्याला बळकटी मिळाली आहे.