सुपारी देऊन प्रेयसीच्या पतीचा खून, 11 जणांना जन्मठेप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अनैतिक संबंधांना अडथळा ठरणाऱया प्रेयसीच्या पतीचा सुपारी देऊन खून केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. तांबे यांनी 11 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. दरम्यान, यातील एकाचा मृत्यू झाला असून, दोनजण फरार आहेत. नितीन बाबासाहेब पडवळे (रा. लाईन बाजार, कोल्हापूर) असे मृताचे नाव आहे.

लीना पडवळे ही नितीन पडवळे यांची दुसरी पत्नी आहे. लीना आणि रवी माने यांचे पाच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. त्यावेळी नितीन आपणास त्रास देऊन मारहाण करतो. तसेच आपल्या दोघांच्या प्रेमात अडचण निर्माण करीत असल्याने, त्याचा खून करण्याचा कट लीना आणि रवीने रचला होता. त्यांनी अमित शिंदे याला नितीनचा खून करण्यासाठी दीड लाखांची सुपारी दिली. त्यानंतर इतर आरोपींसह सर्वांनी 12 जानेवारी 2011 रोजी दुपारी नितीन पडवळेचे अपहरण करून त्याला आंबा मार्गे विशाळगड रोडने मानोली गावच्या जंगलात वाघझरा येथे घेऊन गेले. तेथे चॉपरने गळा चिरून नितीनचा खून करण्यात आला. त्यानंतर त्याचे धड खोल दरीत टाकून देण्यात आले. खुनाचा पुरावा नाहीसा करण्यासाठी कापलेले शिर, शर्ट, गुह्यात वापरलेली बेसबॉलची स्टीक, चॉपर व हॉकीस्टीक असे साहित्य वारणा नदीच्या पात्रात टाकून दिले. तसेच दुचाकीही वारणा नदीपात्रात पुलावरून ढकलून दिली होती.

या प्रकरणात सर्व आरोपींविरुद्ध शाहूवाडी पोलीस ठाण्यात दाखल खुनासह विविध गुन्हे करण्यात आले होते. तत्कालीन पोलीस निरीक्षक डी. एस. घोगरे यांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. या खटल्यात सरकारी वकील एस. एम. पाटील यांनी एकूण 21 साक्षीदार तपासले. सर्व साक्षीदार, पंच, साक्षीदारांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. साक्षीदारांचे जबाब व सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपींना जन्मठेप व प्रत्येकी दहा हजार रुपये दंडाची शिक्षा दिली. खटल्याच्या सुनावणीदरम्यान अमित शिंदे याचा मृत्यू झाला, तर सतीश वडर आणि इंदजित ऊर्फ चिल्या बनसोडे हे फरारी आहेत.

शिक्षा झालेल्या आरोपींची नावे

दिलीप व्यंकटेश दुधाळे (वय 29), रवी रमेश माने (वय 27, दोघे रा. माकडवाला वसाहत, कावळा नाका), विजय रघुनाथ शिंदे (वय 29, रा. नालासोपारा, ठाणे), किशोर दोडाप्पा माने (वय 21, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, साळोखे पार्क, कोल्हापूर), आकाश ऊर्फ अक्षय सीताराम वाघमारे (वय 19, रा. राजारामपुरी 14वी गल्ली, कोल्हापूर), अमित चंद्रसेन शिंदे (वय 23, रा. विक्रमनगर व्यायाम शाळेजवळ, कोल्हापूर), लीना नितीन पडवळे (वय 30, रा. लाईन बाजार, कोल्हापूर), गीतांजली विरुपाक्ष मेनशी (वय 30, रा. शांतीनगर, कोल्हापूर), सतीश भीमसिंग वडर (पाथरवट गल्ली, सायबर चौक, राजारामपुरी, कोल्हापूर), इंद्रजित ऊर्फ चिल्या रमेश बनसोडे (रा. फ्रेंड्स कॉलनी झोपडपट्टी, कावळा नाका, कोल्हापूर) आणि मनेश सवण्णा कुचकोरवी (वय 31, माकडवाला वसाहत, कोल्हापूर) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. यातील अमित शिंदे याचा मृत्यू झाला असून, इंद्रजित बनसोडे आणि मनेश कुचरकोरवी अद्यापि फरार आहेत.