एसटीचे 11 संपकरी कामगार बडतर्फ, महामंडळाची कठोर कारवाई सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱयांना कामावर हजर न झाल्याने बडतर्फ करण्यास अखेर महामंडळाने सुरुवात केली असून निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱयांपैकी 11 कर्मचाऱयांना बुधवारी एसटीच्या सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. या कामगारांना यापूर्वीच बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस दिली होती. सात दिवस त्यांनी कोणताही प्रतिसाद न दिल्याने त्यांना बडतर्फ केल्याचे म्हटले जात आहे. एसटी महामंडळाने संपात सहभागी असलेल्या कामगारांना एक शेवटची संधी म्हणून सोमवार, 13 डिसेंबरपर्यंत कामावर हजर राहण्यास सांगितले होते. परंतु या आवाहनाला 149 कर्मचाऱयांनी प्रतिसाद देत कामावर हजेरी दाखवली. त्यामुळे यानंतर पुढील कारवाई नियमाप्रमाणे सुरू राहील असा इशारा महामंडळाने दिला होता.

एसटीचे आतापर्यंत 21,873 कर्मचारी कामावर हजर झाले आहेत, तर 67,675 कर्मचारी संपात सहभागी आहेत. एसटीच्या 250 पैकी 122 आगारांतील वाहतूक अंशतः सुरू करण्यात यश आले आहे.