80 टक्क्यांहून अधिक गुण मिळविणारे विद्यार्थी प्रवेशाविनाच, अकरावीच्या तिसऱया यादीत 46 हजार प्रवेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अकरावी प्रवेशाची तिसरी गुणवत्ता यादी मंगळवारी जाहीर झाली. या यादीनंतरही 80 टक्क्यांहून अधिक गुण मिळविणारे विद्यार्थी प्रवेशाविनाच आहेत. या विद्यार्थ्यांचे लक्ष आता विशेष प्रवेशफेरीकडे लागले आहे. तिसऱया यादीत 45 हजार 402 विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झाले आहे.

तिसऱया यादीसाठी मुंबई विभागातील कॉलेजांमध्ये सर्व शाखांच्या मिळून एकूण 1,19,171 जागा (कोटा वगळून) उपलब्ध होत्या. यासाठी एकूण 1,16, 080 विद्यार्थ्यांचे अर्ज आले होते, यापैकी 45,402 विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट करण्यात आले आहे. म्हणजे अर्ज केलेल्या सुमारे 70 हजार 678 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकलेला नाही. या यादीसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांपैकी एकूण सहा हजार 179 विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे कॉलेज अलॉट झाले आहे.

दुसऱया फेरीनंतर एक लाख 16 हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. या विद्यार्थ्यांना आता ज्युनिअर कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश निश्चित करायचा आहे. या फेरीनंतरही प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी आता विशेष फेरीचे आयोजन केले जाणार आहे.

कट ऑफमध्ये वाढ

काही नामांकित कॉलेजांचे कटऑफ या यादीत वाढले आहेत. एचआर कॉलेजचा कट ऑफ दुसऱया गुणवत्ता यादीत 470 इतका होता तो तिसऱया गुणवत्ता यादीत 471 इतका झाला आहे. तर केसी कॉलेजचा कला शाखेचा कट ऑफ 449 इतका होता तो 451 इतका झाला आहे. तर वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या कटऑफमध्ये एका गुणाचाही फरक पडलेला नाही.