VIDEO : ११ वर्षीय मुलीवर २२ जणांचा बलात्कार, आरोपींना कोर्टाबाहेर वकिलांनी तुडवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । चेन्नई

बिहारमध्ये शाळेतील मुलीवर शिक्षकासह विद्यार्थ्यांनी बलात्कार केल्याची घटना ताजी असतानाच चेन्नईमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अयानवरम भागामध्ये सातवीमध्ये शिकणाऱ्या एका मुलीवर तब्बल २२ नराधमांना सात महिने बलात्कार केल्याचा प्रकार उघड झाला आहे. पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून १८ जणांना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींना मंगळवारी दुपारी महिला न्यायालयात हजर करण्यात आले तेव्हा उपस्थितांनी त्यांना लाथा-बुक्क्यांनी तुडवले. या नराधमांना फाशीच व्हायला हवी अशी मागणी यावेळी करण्यात आली. विशेष म्हणजे आरोपींना मारहाण करणाऱ्यांमध्ये अनेक वकिलांचाही समावेश आहे. याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून एएनआय या वृत्तसंस्थेने हा व्हिडीओ ट्वीट केला आहे.

काय आहे प्रकरण?
अयानवरम भागामध्ये रहाणाऱ्या एका ११ वर्षीय मुलीवर ती राहात असलेल्या इमारतीत काम करणाऱ्या २२ जणांनी तब्बत सात महिने बलात्कार केला. बिल्डिंगचा सुरक्षिततेसाठी तैनात असलेले सुरक्षा रक्षक, लिफ्ट ऑपरेटर, प्लंबर आणि पाणी सप्लाय करणाऱ्यांनी तिच्यावर बलात्कार केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. आरोपी कधी गुंगीचे औषध द्यायचे, तर कधी गुंगीचे इंजेक्शन द्यायचे आणि त्यानंतर तिच्यावर बलात्कार करायचे असे पीडित मुलीने कुटुंबियांना आणि पोलिसांना सांगितले. आरोपी या मुलीवरील बलात्काराचा अश्लील व्हिडीओ देखील बनवायचे आणि तिला जीवे मारण्याची धमकी देत होते. तब्बल सात महिने हा प्रकार सुरू होता. परंतु अखेर नराधमांचे हे कृत्य जगासमोर आल्यावर सर्वांनाच धक्का बसला असून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

१८ आरोपींना अटक
दरम्यान, पीडित मुलीने हा सर्व प्रकार कथन केल्यावर सर्वांनाच धक्का बसला. पीडितने सर्वात आधी हा प्रकार आपल्या बहिणीला सांगितला. त्यानंतर हा प्रकार उघड झाला. पीडित मुलीच्या कुटुंबियांनी थेट पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी १८ आरोपींना अटक केली असून उर्वरीत आरोपींचा शोध घेत आहेत.