
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी महाविकास आघाडी सरकार विविध उपाययोजना राबवित आहे. या उपाययोजनांचा एक भाग म्हणून परिवहन महामंडळातील एस.टी. कर्मचाऱ्यांचे प्रलंबित वेतन देण्यासाठी विशेष बाब म्हणून 112 कोटींचा निधी तातडीने वितरीत करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. त्यानुसार आज तातडीने निधी वितरीत करण्यात आला आहे.
कोरोना संकट काळात एस.टी.कर्मचाऱ्यांनी उत्तम सेवा बजावली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांच्या पाठीशी महाविकास आघाडी सरकार ठामपणे उभे आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर असणाऱ्या परिवहन महामंडळाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. कोणत्याही कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेत झाले पाहिजे, अशी या सरकारची भूमिका आहे.
कोरोना संकटकाळात टाळेबंदीची परिस्थिती निर्माण झाल्याने एस.टी.च्या वाहतुकीवर परिणाम झाला. प्रवासी संख्या कमी झाली. त्यामुळे परिवहन महामंडळाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. परिणामी पगारासाठी निधीची कमतरता निर्माण झाली. या कठीण परिस्थितीचा विचार करता परिवहन महामंडळाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 112 कोटींचा निधी तातडीने वितरीत करण्याचे निर्देश दिले व त्याची तात्काळ अंमलबजावणी झाली.
तत्पूर्वी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाईभत्त्यात 5 टक्के वाढ करण्यात आली. तसेच दिवाळी भेट म्हणून अधिकाऱ्यांना पाच हजार रुपये तर कर्मचाऱ्यांना 2,500 रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा परिवहनमंत्री आणि महामंडळाचे अध्यक्ष ऍड. अनिल परब यांनी केली. या निर्णयाचा लाभ एसटी महामंडळाच्या 93 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना होणार आहे. विशेष म्हणजे ऑक्टोबरचा पगार दिवाळीपूर्वी 1 नोव्हेंबरला होणार आहे
































































