
उत्तर नगर जिह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा, निळवंडे, आढळा धरणांसह 12 लघुपाटबंधाऱ्यांचे पोट खपाटीला गेले आहे. यंदाच्या उन्हाळय़ात आदिवासी भागासह अकोले, संगमनेर, श्रीरामपूर परिसरातील अनेक गावांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागणार असल्याचे चित्र आहे. पावसाचे आगार समजल्या जाणाऱ्या हरिश्चंद्रगड, कळसुबाई शिखर, भंडारदरा, निळवंडे, आढळा धरण पाणलोट क्षेत्रात गतवर्षी समाधानकारक पाऊस झाला नाही. यंदा मार्चच्या प्रारंभीच तालुका तापायला सुरुवात झाली आहे. यामुळे आत्तापासूनच आदिवासी परिसरासह शहरांमध्येही उन्हाचा कडाका जाणवत आहे.
उन्हाचा चटका वाढत असताना, धरणांच्या पाणीपातळीत झपाटय़ाने घट होत आहे. उत्तर नगर जिह्याची जीवनदायिनी भंडारदरा धरणात आजमितीस केवळ 5329 दलघफू म्हणजेच 50 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत 10,586 दलघफू पाणीसाठा शिल्लक होता. निळवंडे धरणात 3827 दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. गतवर्षी आजमितीस 4949 दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक होता. आढळा धरणात 808 दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षी आजमितीस 927 दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक होता. दरम्यान, भंडारदरा व निळंवडे धरणांची खालावणारी पाणीपातळी उत्तर नगर जिह्यासाठी धोक्याची घंटा आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवडय़ातच दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या आहेत.
माळरानं ओसाड झाली आहेत. विहिरींनी तळ गाठलाय, तर कळंब, मन्हाळे, मुथाळणे, देवठाण, केळी व ओतूरच्या वाडय़ा, घोडेवाडी परिसरात दरवर्षीप्रमाणे पाणीटंचाई निर्माण होणार आहे. आदिवासी भागात बहुतांश गावांमध्ये विहिरींनी तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्यासाठी दूरवर भटकंती करण्याची वेळ आली आहे. मात्र, ‘जलजीवन’ अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम संथगतीने सुरू आहे.
भंडारदरा व निळवंडेतील पाण्याचे नियोजन व्हावे
मार्च, एप्रिल, मे हे महिने तीव्र उन्हाचे असल्याने पाण्याची अधिक गरज असते. मात्र, धरणांतील कमी होऊ लागलेला जलसाठा धोक्याची घंटा निर्माण करणारा आहे. त्यामुळे पाण्याचे काटेकोर नियोजन करण्याची मागणी होत आहे. त्यातच काही दिवसांत लोकसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे पाणी समस्येचा प्रश्न निवडणुकीत विरोधकांकडून ऐरणीवर राहणार आहे, हे नक्की.
असा आहे पाण्याचा साठा
शिळवंडी ः 143.55 क्षमता 95.14 दशलक्ष घनफूट. सांगवी ः 71.23 क्षमता 33.44 दशलक्ष घनफूट. पाडोसी ः 146 क्षमता 69.81 दशलक्ष घनफूट. अंबित ः 193 क्षमता 95.26 दशलक्ष घनफूट. देवहंडी ः 155 क्षमता 60.06 दशलक्ष घनफूट. बलठण ः 202 क्षमता 109.42 दशलक्ष घनफूट. कोथळे ः 182 क्षमता 102 दशलक्ष घनफूट. टिटवी ः 303.32 क्षमता 232.43 दशलक्ष घनफूट. बोरी ः 47.80 क्षमता 29.59 दशलक्ष घनफूट. बदगी बेलापूर ः 94.98 क्षमता, 42.98 दशलक्ष घनफूट. वाकी ः 112.66 क्षमता 79.95 दशलक्ष घनफूट. पिंपळगाव खांड ः 600 क्षमता 194.16 दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे. जायकवाडीला गेलेले पाणी व निळवंडेच्या उजव्या व डाव्या कालव्यांतून सोडलेल्या पाण्यामुळे लाभक्षेत्रात आनंद असला तरी आदिवासी भागासह नदीकाठच्या गावांना शेतीसह पिण्यासाठी पाण्याची समस्या भेडसावणार आहे.






























































