वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती , सिन्नरला पाण्यात बुडून बारा वानरांचा मृत्यू

78

सामना ऑनलाईन | नाशिक

भीषण दुष्काळाने होरपळणाऱया वन्य प्राण्यांची पाण्यासाठी रानोमाळ पळापळ सुरू आहे. मंगळवारी सिन्नरच्या चापडगाव येथील शेतात एका बिबटय़ाला जेरबंद करण्यात आले, तर चांदोरी येथे पाण्याच्या शोधात विहिरीत पडलेल्या बिबटय़ाला सुखरूप बाहेर काढण्यात आले. सिन्नर तालुक्यात आडवाडी येथील आड किल्ल्याच्या कुंडात पाण्यासाठी उडी घेतलेल्या बारा वानरांचा बुडून मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. वानरांची गणना केली नाही व त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी आमची नाही, असे वन खात्याच्या अधिकाऱयांनी सांगितले. यामुळे सप्तशृंग गड, त्र्यंबकेश्वरसह जिह्यात अन्य ठिकाणी वास्तव्यास असलेल्या वानरांचा जीव अन्न-पाण्यावाचून धोक्यात आला आहे.

भीषण दुष्काळामुळे तीक्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्याच्या आणि भक्ष्याच्या शोधात भटकंती करणाऱया बिबटय़ांचे मृत्यू वाढत आहेत. सिन्नर तालुक्यातील चापडगाव येथे सरपंच दत्तोपंत सांगळे यांच्या शेतातील बिबटय़ाला आज पिंजऱयात जेरबंद करण्यात आले. मोहदरी येथील वन उद्यानात सोडून देण्यात आले.

निफाड तालुक्यातील चांदोरी येथे पाण्याच्या शोधात एक बिबटय़ा पहाटे नानासाहेब कोरडे यांच्या विहिरीत पडला. सकाळी त्याच्या डरकाळ्यांनी परिसरातील रहिवाशांनी विहिरीकडे धाव घेत वन अधिकाऱयांना माहिती कळविली. वन परिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी, वनपाल बाबुराव वाघ, विजय टेकनर, गोपाळ हरगावकर, भैय्या शेख, विलास देशमुख यांच्या पथकाने विहिरीत बाज व पिंजरा सोडून या दोन वर्षे वयाच्या मादी बिबटय़ाला सुखरूप बाहेर काढले.

 वनखात्याकडून माकडचेष्टा

सिन्नर तालुक्यात आडवाडी येथील आड किल्ल्यावरील कुंडात उडी घेतलेल्या बारा वानरांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी पर्यटकांच्या निदर्शनास आली. हे मृत्यू कधी झाले, हे निश्चित सांगता येणार नाही. पाणी पाहून एका वानरापाठोपाठ इतरांनी उडी घेतली असावी. बाहेर येणे शक्य न झाल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असावा, असे वन खात्याच्या अधिकाऱयांनी सांगितले. बिबटे, हरिण, काळवीट, मोर यांच्यासाठी वन खात्याकडून ठिकठिकाणी कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आल्याचे वन खात्याकडून सांगितले गेले. सिन्नरच्या आड किल्ल्यावरील ‘त्या’ कुंडातही वानरांसाठी लाकडी शिडी लावून तात्पुरती उपाययोजना करण्यात आली आहे. त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरीच्या पर्वतरांगा, वणी येथील सप्तशृंग गडावर शेकडो वानर आहेत. याशिवाय जिह्यात इतर ठिकाणीही वानर आहेत. वानरांची गणना केली जात नाही, त्यांच्यासाठी पाण्याची उपाययोजना करण्याची जबाबदारी वन खात्यावर नाही, तसा नियमही नाही, असे वन अधिकाऱयाने स्पष्ट केले. यामुळे पाण्यासाठी भटकंती करणाऱया जिह्यातील शेकडो वानरांचा जीव धोक्यात आला आहे, त्यांना वाचविणार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे

आपली प्रतिक्रिया द्या